जळगाव, दि. १३ शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीच्या नावाखाली महिलांचा छळ होत असल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याची दोन प्रकरणे घडल्याचा उल्लेख करत त्यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. जळगाव शहरातील गोकूळ चव्हाण या संशयिताने लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरी भेट दिली. आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देण्याच्या बदल्यात तिच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे.
या प्रकारामुळे पीडित महिला हादरून गेली. तिने तातडीने पतीच्या मदतीने शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, संशयित सध्या फरार असल्याने पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर, रोहिणी खडसे यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जळगावमधील प्रकाराची दखल घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ई-केवायसीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये. महिलांनी ही प्रक्रिया स्वतः मोबाईलवरून पूर्ण करावी किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घ्यावी, कोणत्याही मध्यस्थाची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.














































