मतदारयादीवरुन विरोधक सध्या महाराष्ट्राला टार्गेट करत आहेत…
विधानसभा निवडणुकीत मिळालेली आकडेवारी न पहाता आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे – सुनेत्रा पवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष एक नंबरवर आणायचा असेल तर स्री शक्तीशिवाय शक्य नाही – आनंद परांजपे
राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक मुंबईत पार…
मुंबई दि. १४ ऑगस्ट – लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप विरोधक करत आहेत. महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप करण्यात आला पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे असा टोला लगावतानाच अजितदादांनी ही योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत करुन दिली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक आज मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात राज्यातील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत आगामी निवडणुकांसंदर्भात पार पडली.
सर्व समाज घटकांतील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. हे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिथे उभा असेल तिथे अजितदादांच्या रुपाने पक्षाची ताकद उभी केली जाईल असे आश्वासन सुनिल तटकरे यांनी यावेळी महिलांना दिले.
निवडणूक आयोगाचे नवीन मतदार नोंदणीचे काम सुरूच असते.निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर केली जाते. मतदारांकडून हरकती मागविल्या जातात आणि मतदारनिहाय आकडेवारीही जाहीर केली जाते. संबंधित मतदारयादी त्या – त्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून पाठवली जात असते. खरं म्हणजे त्यावेळी विरोधकांनी हरकत नोंदवायला हवी असते. मात्र विरोधक सध्या महाराष्ट्राला टार्गेट करत आहे असा थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ५० टक्के जागा महिलांसाठी असतील. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा मिळतील यात शंका नाही. येणारी निवडणूक जिंकायची आहे. विधानसभेत जशा जास्त जागा मिळाल्या आहेत. ते पहाता पुढच्या काळात आपली जबाबदारी वाढणार आहे हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.
अल्पसंख्याक समाज विधानसभा निवडणुकीत आपल्यापासून दुरावला होता आहे. परंतु आता राष्ट्रवादीकडे अल्पसंख्याक समाज येत आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष असून शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारधारेनुसार काम करत आहोत अशी स्पष्ट भूमिका सुनिल तटकरे यांनी यावेळी मांडली.
निवडणूकीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांना महायुती म्हणून सामोरे जायचे आहे. कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात जे राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत आहेत त्यात सरस काम राष्ट्रवादी महिला काँग्रेस करत आहे. जिल्हा नियोजनावर एक तरी महिला असली पाहिजे आणि ती संघटनेची असली पाहिजे. महिलांनी केलेल्या कामाची दखल पक्ष नक्कीच घेणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
राजकारणात वैचारीक लढाई ही होत असते. प्रत्येक पक्ष काम करत असताना वैचारिक लढाई लढत असताना काही जण आपला स्तर खाली आणत आहेत. त्यामुळे पक्ष संघटनेचे काम चौकटीतच राहून केले पाहिजे. पदाचा वापर पक्षाच्या शिस्तीच्या विरोधात असता कामा नये असेही सुनिल तटकरे यांनी महिलांना सांगितले.
आगामी निवडणूका चांगल्या लढल्या तर पुढील लोकसभा, विधानसभा आपल्याला ताकदीने लढता येणार आहेत हे लक्षात घ्या. स्थानिक पातळीवरील नेतृत्व राज्यपातळीवर येऊ शकते हे सांगतानाच पुणे हे आपलं मातृत्व… नेतृत्व करणारा जिल्हा आहे. त्यामुळे पुणे जिल्हा कालही… आजही आणि उद्याही असेल यावर दुमत नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
चळवळीत काम करणाऱ्या आपण महिला आहात. राष्ट्रवादी काँग्रेसची महिला संघटना ही महिलांसाठी प्रभावीपणे काम करत आहे याचा मला अभिमान आहे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी कौतुक केले.
विधानसभा निवडणुकीत मिळालेली आकडेवारी न पहाता आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे – सुनेत्रा पवार
आपल्या पक्षाला २६ वर्षे झाली असली तरीही पक्षामध्ये सक्रीय होऊन मोठा पल्ला गाठायचा आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेली आकडेवारी न पहाता आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुनेत्राताई पवार यांनी महिलांना केले.
शासनाच्या माध्यमातून आपले नेते करत असलेले काम लोकांपर्यंत पोहोचवायचे असून हे सोशल मीडियाचे युग आहे. त्या माध्यमातून आपल्या कामाची प्रभावीपणे मांडणी करण्याची गरज आहे. आपण जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर असतो त्यामुळे त्याचा उपयोग करुन पक्षाचे चांगले काम या सोशल मीडियावर मांडायला शिका असे आवाहन सुनेत्राताई पवार यांनी महिलांना केले.
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ही आपल्या कामाची पहिली पायरी असते. यामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला तर त्यांना संधी मिळू शकते. सर्वांना संधी मिळेल असे नाही. पण ही संधी परत येईल यादृष्टीने पक्षाच्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या कामाची दखल पक्षाच्या वरीष्ठ पातळीवर घेतली जाते हेही सुनेत्राताई पवार यांनी सांगितले.
निवडणुकीत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जनतेत जाण्याची संधी मिळणार आहे हे लक्षात घ्या. तुमच्यातून एक नेतृत्व उभे राहू शकते असे आश्वासक शब्द देतानाच महिला सुरक्षा, शिक्षण यावर आपले सरकार काम करतेय. या योजनांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची रणरागिणी प्रत्येक घराघरात पोचली पाहिजे असे आवाहनही सुनेत्राताई पवार यांनी महिलांना केले.
मला पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार महिलांचे प्रश्न संसदेत मांडत आले आहे आणि अजूनही तुमचे प्रश्न मांडत राहणार आहे असे आश्वासनही सुनेत्राताई पवार यांनी दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष एक नंबरवर आणायचा असेल तर स्री शक्तीशिवाय शक्य नाही – आनंद परांजपे
पुरुषांपेक्षा महिला जास्त ताकदीने पक्षासाठी पुढे येऊन काम करतात त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष एक नंबरवर आणायचा असेल तर स्री शक्तीशिवाय शक्य नाही त्यामुळे आतापासूनच कामाला सुरुवात करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले.
महिला आढावा बैठकीत महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी खात्यांतर्गत महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तर महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी महिला संघटना बांधणी कशापध्दतीने सुरू आहे आणि महिला संघटना वाढीसाठी कसे प्रयत्न करत आहेत याची माहिती दिली. याशिवाय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, राजश्रीताई भोसले, व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राज्यसभा खासदार सुनेत्राताई पवार, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, पुण्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस राजलक्ष्मी भोसले, प्रदेश उपाध्यक्ष मायाताई कटारिया, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, मुंबई अध्यक्षा आरती साळवी, कार्याध्यक्षा मनिषा तुपे, राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षा, शहराध्यक्षा, कायर्याध्यक्षा, निरीक्षक व प्रदेश पदाधिकारी उपस्थितीत होत्या.