लाडकी बहिण योजनेला ब्रेक

0
3

मुंबई, दि. 19 (पीसीबी) : महाराष्ट्र निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत २.४ कोटीहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे पैसे खात्यात आले आहेत. मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना पुढील महिन्याची रक्कम मिळणार नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकांच्या घोषणेनंतर आता राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आचारसंहितेदरम्यान, मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लाडक्या बहि‍णींना कार्यक्रमाला आणण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव, ३ हजार कोटींच कर्ज घेण्याची नामुष्की, काँग्रेसचा आरोप

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी महिला आणि बालकल्याण विभागाने थांबवला आहे. यामुळे पात्र महिलांना योजनेचे पैसे निवडणुकीपर्यंत मिळू शकणार नाहीत. त्यामुळेच राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र दिले आहेत. त्यामुळे महिलांना आता डिसेंबरचे पैसे मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

योजना काही काळ स्थगित, कारण काय?
मतदारांना आर्थिक लाभ देऊन थेट प्रभावित करणाऱ्या योजना तातडीने बंद कराव्यात, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व प्रशासकीय विभागांना जारी केल्या आहेत. याशिवाय आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचाही आढावा घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कालिंगम यांनी सर्व विभागांना याबाबत विचारणा केली.
आचारसंहिता लागताच लाडकी बहीण योजनेचं काय? महिलांना प्रश्न, पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी

यादरम्यान त्यांना माहिती मिळाली, की लाडली बहीण योजनेअंतर्गत महिला आणि बालकल्याण विभाग मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देत आहे. त्यानंतर या योजनेची माहिती विभागाकडून मागवण्यात आली आहे. लाडकी बहीण या योजनेतील निधीचं वितरण चार दिवसांपूर्वी विभागाने थांबवल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे या योजनेवर तात्पुरता ब्रेक लागला आहे. योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी महिल्यांच्या खात्यात अधिकचे अडीच हजार येणार असल्याची चर्चा होती, मात्र ती बातमी चुकीची असल्याचं समोर आलं आहे.