लाडकी बहिण योजनेत मिळालेल्या रक्कमेतून बँकेने दंड वसूली थांबवावी,

0
131

अन्यथा अश्या बँकांविरुद्ध तीव्र आंदोलन करणार – सीमा सावळे

पिंपरी, दि.१८ ऑगस्ट (पीसीबी) – राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात आले आहेत. हे पैसे मिळवण्यासाठी अनेक महिलांनी पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये प्रचंड गर्दी केली आहे. परंतु काही महिलांच्या हाती पैसे येऊनही निराशा आली आहे. लाडकी बहिणी योजनेतून प्राप्त झालेल्या रकमेतून बँकांची वसुली सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत मिळालेल्या रक्कमेतून मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली बँकांकडून सुरु असलेली वसुली तातडीने थांबविण्यात यावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी तातडीने आदेश काढावेत. तसेच बँकांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली कापलेली रक्कम त्वरित महिलांच्या खात्यात वर्ग करावी आणि यापुढे अशी वसुली करू नये, अन्यथा अश्या बँकांविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी दिला.

याबाबत माहिती देताना सीमा सावळे म्हणाला कि, “राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्या दोन दिवसांपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत. पण अनेक ठिकाणी महिलांना हे पैसे मिळून काहीच उपयोग झाला नाही. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये आल्यावर देखील त्यांच्या खात्यातून पैसे गायब झाले आहेत. यामुळे महिलांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणीची ओवाळणीचे 3 हजार रुपये खात्यात जमा केले, पण मिनिमम बॅलन्सच्या (कमीत कमी जमा) नावाखाली बँकेने दंड वसूल केल्याने महिलांच्या हाती काहीच उरले नाही तर काही ठिकाणी ५०० ते १ हजार रुपये खात्यात शिल्लक राहिले आहेत. महिलांच्या खात्यात जमा झालेल्या तीन हजार रुपये रक्कमेपैकी हातात काही मिळत नसल्याने महिला खातेदार अक्षरशः हैराण झाल्या आहेत. बाकीची रक्कम कुठे गायब झाली ? असा सवाल या महिला करत खराळवाडी परिसरातील काही महिला माझ्याकडे तक्रार घेऊन आल्या. खराळवाडी येथील बँकेत हा प्रकार घडला असल्याने इतर ठिकाणी माहिती घेतली असता असा प्रकार अनेक ठिकाणी घडला असल्याचे समोर आले आहे”. काही ठिकाणी नवऱ्याच्या किंवा आई-वडिलांच्या जॉइंट अकाउंट मध्ये जमा झालेल्या पैश्यातून सुद्धा बँकांनी दंड / कर्ज वसुली सुरु केली आहे.

सिमा सावळे पुढे म्हणाल्या कि, “नुकताच एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे ग्राहकांकडून तब्बल ८ हजार ४९५ कोटी रुपये वसूल केले आहेत. लाडकी बहीण योजनेत मिळालेल्या रक्कमेतून मिनिमम बॅलन्सच्या नावखाली बँकांकडून सुरु असलेली वसुली तातडीने थांबविण्यात यावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी तातडीने आदेश काढावे अशी मी विनंती करते. तसेच ज्या महिलांच्या खात्यातून बँकांनी मिनिमम बॅलन्सच्या नावखाली वसुली केली आहे अशा महिलांनी मला संपर्क करावा, असे आवाहन सिमा सावळे यांनी केले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेत मिळालेल्या रक्कमेतून मिनिमम बॅलन्सच्या नावखाली अथवा नवऱ्याच्या किंवा आई-वडिलांच्या जॉइंट अकाउंट मधून सुरु असलेली दंड / कर्ज वसुली बँकांनी सुरु ठेवली तर अशा बँकांविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा देखील सिमा सावळे यांनी देला आहे.