लाच प्रकरणी पाणी मीटर निरीक्षकासह कर्मचारी महिलेवर गुन्हा दाखल

0
57

दापोडी, दि. ८ (प्रतिनिधी)

पाणीपट्टीचे बिल नियमित काढण्यासाठी एक हजार ६०० रुपयांची लाच स्वीकारताना कर्मचारी महिलेला रंगेहात पकडले. तिच्यासह महापालिकेच्या पाणी मीटर निरीक्षकावर देखील गुन्हा दाखल केला. पुणे लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयात गुरुवारी (दि. ७) ही कारवाई केली.

विकास सोमा गव्हाणे आणि अशा कानिफनाथ चौपाली यांच्या विरोधात दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विकास गव्हाणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयात पाणी मीटर निरीक्षक (वर्ग ३) म्हणून कार्यरत आहेत. तसेच आशा चौपाली ही कंत्राटी कम्प्युटर ऑपरेटर आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय व्यक्तीने पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती.

महापालिकेच्या पाणीपट्टीचे बिल सरासरी येत असल्याने ते बिल नियमित काढण्यात यावे, अशी मागणी तक्रारदाराने केली होती. जितका वापर होईल तितक्याच पाण्याचे बिल काढण्यासाठी विकास गव्हाणे याने स्वतःसाठी एक हजार रुपये तर आशा चौपाली हिच्यासाठी सहाशे रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीने सापळा लावला असता, आशा चौपाली हिने एक हजार सहाशे रुपये लाच स्वीकारली. त्यावेळी तिला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तसेच विकास गव्हाणे याने लाचेचे एक हजार रुपये आशा चौपाली हिच्याकडे ठेवण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.