लाच घेताना अख्ख कृषी कार्यालय सापडलं

0
230

संभाजीनगर, दि. २८ (पीसीबी)- गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) जोरदार कारवाया केल्या जात आहेत. या कारवायांमध्ये एक-दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात अडकतात. परंतु अख्ख कार्यालयचं लाचखोर निघालं आणि जाळ्यात सापडलं तर. वाचून धक्का लागला ना? सोमवारी एसीबीकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आलेली कारवाई सर्वत्र चर्चेत आली आहे. कारण लाच घेताना अख्ख कार्यालय सापडलं आहे.

ठिबक सिंचन साहित्याच्या डीलरचे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी आणि अनुदानप्राप्त 35 फाईलसाठी 24 हजार 500 रुपयांची लाच घेणाऱ्या खुलताबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. या लाचखोर अख्ख्या कृषी अधिकारी कार्यालयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक तथा सापळा अधिकारी दिलीप साबळे यांनी केली. त्यांना पोलीस हवालदार भीमराज जीवडे, नाईक पाठक, अंमलदार शिंदे, बागुल यांनी सहाय्य केले.

लाच घेणाऱ्या अटकेतील आरोपींमध्ये तीन महत्त्वाचे वर्ग दोनचे अधिकारी आहेत, तर एकजण कंत्राटी ऑपरेटर आहे. आरोपींमध्ये तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर (वय 49 वर्षे), मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे (57 वर्षे), बाळासाहेब संपतराव निकम (57 वर्षे) आणि कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे (वय 24 वर्षे) यांचा समावेश आहे.

याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डीलरने कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत विभागातील 35 शेतकऱ्यांना कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरविले होते. याबाबतच्या संचिका आरोपी कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे यांच्यामार्फत सादर न करता परस्पर तपासून घेतल्या होत्या. त्यामुळे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी व तक्रारदार यांचे विरुद्ध आलेला माहिती अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदान प्राप्त 35 फाईलसाठी प्रत्येकी सातशे रुपये फाईल याप्रमाणे 24 हजार 500 रुपयेची लाच अधिकाऱ्यांनी मागितली होती.

मात्र तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी एसीबी कार्यालयात या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा लावला. आरोपी अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार कंत्राटदार आरोपी सागर याने लाचेपोटी 24 हजार 500 रुपये स्विकारले. तर बाळासाहेब निकम याने मुळ लाच मागणीशिवाय अधिकचे एक हजार रुपये स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी मागणी करुन ते स्विकारले. तसेच डीलरच्या तक्रारीवरुन एसीबीने शहानिशा केली असता इतर आरोपी अधिकाऱ्यांनी देखील लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चौघाही आरोपींना एसीबीने बेड्या ठोकत, खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.