लाचखोरीतील स्थायी समितीच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द; आयुक्तांचा निर्णय

0
307

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यासोबत लाच प्रकरणात अडकलेल्या महापालिकेतील सहा कर्मचा-यांचे आयुक्त शेखर सिंह यांनी निलंबन रद्द केले आहे. निलंबन आढावा समितीच्या शिफारसीनुसार न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून निलंबन रद्द केल्याचे प्रशासनाने सांगितले.

वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना या कर्मचा-यांना ‘एसीबी’ने 18 ऑगस्ट 2021 रोजी महापालिका मुख्यालयातच रंगेहाथ पकडले होते. त्यात भाजपचे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन  लांडगे,  त्यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, विजय चावरिया, राजेंद्र शिंदे आणि  अरविंद कांबळे यांना या प्रकरणी अटक झाली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. लाच प्रकरणात अटक झाल्यामुळे पिंगळे, चावरिया, शिंदे, कांबळे यांच्यासह लिपिक प्रदीप कोठावदे, हबैती मोरे यांना पालिका सेवेतून निलंबत केले होते. सुमारे 16 महिन्यांपासून ते निलंबत होते. त्यांची विभागीय चौकशी अद्यापही सुरुच आहे.

या निलंबित कर्मचा-यांच्या निलंबनाचा आढावा घेण्याकरिता हे प्रकरण आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखालील निलंबन आढावा समिती समोर सादर करण्यात आले होते. या समितीत आयुक्तांबरोबरच नगरसचिव विभागाचे प्रमुख म्हणून प्रभारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, कायदा विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांचा समावेश होता. या निलंबित कर्मचा-यांची विभागीय चौकशी, त्यांच्याविरुद्धच्या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन या कर्मचा-यांचे निलंबन रद्द करुन त्यांना अकार्यकारी पदावर जनंसपर्क येणार नाही अशा ठिकाणी पुन:स्थापित करण्याची समितीने सर्वानुमते शिफारस केली. त्यानुसार पिंगळे (शिक्षण विभाग), चावरिया (आयटीआय मोरवाडी), शिंदे (क्रीडा), कांबळे (कामगार कल्याण), कोठावदे (अ क्षेत्रीय कार्यालय)  आणि मोरे (ग क्षेत्रीय कार्यालय) यांचे निलंबन रद्द करत त्यांना या विभागात पदस्थापना दिली आहे.