लाईटमीटरचा शॉक लागून दोन सख्ख्या लहान भावांचा मृत्यू

0
572

पुणे, दि. ०९ (पीसीबी) – विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या लहान भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंढवा येथे ३० जूनला रात्री साडे नऊ ते साडे दहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर मुंढवा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शौर्य पोटफोडे (वय-८) आणि कान्हा पोटफोडे (वय-६) असे मृत्यू झालेल्या दोन लहान मुलांची नावे आहेत. तर धारु काळे (रा. नऱ्हे आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुजा गणेश पोटफोडे (वय-२४ रा. अर्धापुर, ता. अर्धापुर, जि. नांदेड सध्या रा. एल.एल.पी. लेन नं.२ कार्निव्हल हॉटल समोर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुजा पोटफोडे या मजुरीचे काम करतात. तर पोटफोडे या कार्निव्हल हॉटेल समोरील बिल्डिंगच्या समोरील पत्राच्या शेडमध्ये कुटुंबासोबत राहत होत्या.

दरम्यान, घटनेच्या दिवशी आरोपी धारु काळे याने बिल्डींगच्या लाईटमीटर मधून जुन्या केबलच्या आधारे लाईट लावून दिली. मात्र, पत्र्याच्या शेडमध्ये लाईट लावताना कोणतीही खबरदारी न घेतल्याने पत्र्याच्या शेडमध्ये विज प्रवाह उतरला. विजेचा प्रवाह उतल्याने शौर्य आणि कान्हा या दोन सख्ख्या लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी या घटनेची अकस्मात मयत म्हणून नोंद केली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी धारु काळे याने खबरदारी न घेता हलगर्जीपणा केल्यामुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी भोसले करीत आहेत.