पिंपरी, दि. 9 (पीसीबी) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, मंगल प्रवाह सोशल कॅम्पिनिंग आणि लोकजागर ॲक्टिव्हिटी यांच्या वतीने लहुवंदना पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे शौर्य, त्याग आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करून देणारी लहुवंदना वर्तमान पिढीने समजावून घ्यावी, पाठ करावी अन् त्याद्वारे त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची प्रेरणा आणि सामाजिक क्रांतीची जाणीव निर्माण व्हावी हाच स्पर्धेचा उद्देश आहे. ही स्पर्धा वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन गटांत होईल. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी तसेच शाळाबाह्य विद्यार्थी आणि कार्यकर्ते स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. यासाठी बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असून रविवार, दिनांक २६ जानेवारी २०२५ पर्यंत लहुवंदना गायनाची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) ९३७१८९४६९० या क्रमांकावर पाठवायची आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना खालीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येतील.
वैयक्तिक :-
प्रथम क्रमांक रोख रक्कम ₹२१००/- आणि लहुमुद्रा प्रतिमा
द्वितीय क्रमांक रोख रक्कम ₹११००/- आणि लहुमुद्रा प्रतिमा
तृतीय क्रमांक रोख रक्कम ₹५००/- आणि लहुमुद्रा प्रतिमा
सांघिक :-
प्रथम क्रमांक रोख रक्कम ₹१००००/- आणि लहुमुद्रा प्रतिमा
द्वितीय क्रमांक रोख रक्कम ₹५०००/- आणि लहुमुद्रा प्रतिमा
तृतीय क्रमांक रोख रक्कम ₹२१००/- आणि लहुमुद्रा प्रतिमा
तसेच सर्व सहभागींना लहुमुद्रा देण्यात येईल.
स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे व क्रांतिवीर वासुदेव फडके स्मारक, चिंचवड स्टेशन, जुना मुंबई – पुणे महामार्ग, चिंचवड येथे होईल. अचूक पाठांतर, अचूक लहुप्रमाण, सुरेल चाल, ताल, लय याबरोबरच योग्य वेषभूषा आणि सादरीकरण हे स्पर्धा परीक्षणाचे साधारणत: निकष असून सांघिक गटात कमीतकमी १० आणि जास्तीतजास्त कितीही स्पर्धक सहभाग घेऊ शकतात. याबाबत अधिक माहितीसाठी शाहीर आसराम कसबे व्हॉट्सॲप क्रमांक ९३७१८९४६९० यांच्याशी संपर्क साधावा.