भुवनेश्वर, दि. २० (पीसीबी) : ओडिशातील पोलिसांनी लष्कराच्या जवानाला मारहाण करत त्याच्या होणाऱ्या पत्नीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १४ सप्टेंबर रोजी भुवनेश्वरमधील एका पोलीस ठाण्यात ही घटना घडली. याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून यात पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह दोन महिला पोलिसांचाही समावेश आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला भुवनेश्वरमध्ये एक छोटेसे रेस्टॉरंट चालवते. काही दिवसांपूर्वीच तिचे लष्करातील जवानाबरोबर लग्न जुळले. अशातच १४ सप्टेंबर रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास ती रेस्टॉरंट बंद करून तिच्या होणाऱ्या पतीबरोबर घरी जात होती. त्यावेळी काही तरुणांनी तिची छेड काढली. त्यामुळे तिने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तक्रार नोंदवून न घेता तेथील महिला पोलिसांनी तिच्याशी गैरवर्तन करत तिला शिवीगाळ केली.
महिलेने केलेल्या आरोपानुसार, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. याउलट दोघांविरोधात गुन्हा दाखल करत तिच्या होणाऱ्या पतीला अटक केली. पीडित महिलेने त्याचा विरोध केला असता, त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केले. तेवढ्यात काही पुरुष पोलीस कर्मचारीही त्याठिकाणी आले. त्यांनी महिलेच्या जॅकेटने तिचे हात तसेच अन्य एका महिला पोलिसांच्या स्कार्फने तिचे पाय बांधले. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेची अंतर्वस्र काढत तिच्या छातीवर लाथ मारली. तसेच त्याठिकाणी उपस्थित असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनीही तिला मारहाण केली.
महिलेची प्रकृती बिघडल्याने सकाळी तिला भुवनेश्वर एम्समध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिलेने माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी तिने तिच्याबरोबर घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारही दाखल केली. याप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही महिलेने सांगितले.
दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर राज्य सरकारने याप्रकरणी कारवाई करत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह पाच जणांना निलंबित केलं आहे. यामध्ये दोन महिला पोलिसांचाही समावेश आहे.