लव्ह जिहाद प्रकरण नवनीत राणांच्या चांगलेच अंगलट

0
285

अमरावती, दि. १२ (पीसीबी) – गेल्‍या मंगळवारी घरून रागाच्‍या भरात निघून गेलेल्‍या या तरूणीला बुधवारी रात्री सातारा रेल्‍वे स्‍थानकावरून ताब्‍यात घेण्‍यात आले. या तरूणीला सोबत घेऊन अमरावती पोलीस शुक्रवारी पहाटे शहरात पोहचले. मी कुणासोबतही पळून गेले नव्‍हते. मला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एक अभ्‍यासक्रम शिकण्‍याची इच्‍छा होती, पण त्‍यावर घरात केवळ चर्चाच सुरू होती. निर्णय घेतला जात नव्‍हता, त्‍याच्‍याच रागातून आपण घर सोडल्‍याचे या तरूणीचे म्‍हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणात आपली बदनामी करण्‍यात आली असून सध्या सुरू असलेली बदनामी थांबवा अशी विनंती देखील या तरूणीने केली आहे. ही तरूणी आता तिच्‍या घरी सुखरूप पोहचली आहे.

खासदार नवनीत राणा यांनी हे प्रकरण ‘लव्‍ह जिहाद’चे असल्‍याचे सांगून पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. राजापेठ पोलीस ठाण्‍यात पोहोचून फोनवरील संभाषण ध्‍वनिमुद्रित का केले, असा सवाल करीत गोंधळ घातला होता. पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्‍यांची शाब्दिक खडाजंगीही झाली होती. दुसरीकडे, भाजपचे प्रदेश प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी आणि हिंदुत्‍ववादी संघटनांनी देखील अशाच स्‍वरूपाचे आरोप केले होते.

तरूणी बेपत्‍ता झाल्‍याच्‍या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात एका अल्‍पसंख्‍याक समाजातील युवकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती. मात्र त्या युवकाचा या मुलीशी पळून जाण्यास सोबत कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. युवतीच्या मैत्रिणींची देखील पोलिसांनी चौकशी केली होती. त्यानंतर ही युवती नेमकी कुठे गेली, याचा शोध अमरावती पोलिसांनी यशस्वीपणे घेतला. तरूणीने अमरावती पोलिसांना दिलेला लेखी जबाब आणि पोलिसांनी केलेला तांत्रिक तपास यातून तिला कुणीही पळवून नेले नव्‍हते, तर ती स्‍वत:हून बडनेरा, भुसावळ, पुणे मार्गे सातारा येथे पोहोचल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.
दुसरीकडे राणा दाम्‍पत्‍याने तरूणीचा शोध घेण्‍याचे श्रेय अमरावती पोलिसांना न देता हे आपला पाठपुरावा आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश यामुळे झाल्‍याचा दावा केला. पोलीस आयुक्‍त डॉ. आरती सिंह यांच्‍यावर देखील त्‍यांनी आरोप केले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात शहरातील वातावरण ढवळून निघाले. सामाजिक सौहार्द बिघडवण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याची प्रतिक्रिया देखील उमटली. राजकारण अवश्य करा पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावे याला मर्यादा असते. विकासाच्‍या मार्गावर यश मिळवले जाऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर धार्मिक ध्रुवीकरण हा राजकीय यशाचा हमखास मार्ग आहे असे काही लोकांना वाटते, पण एकदा का अमरावती शहर एक धार्मिक दृष्ट्या संवेदनशील म्हणून पंचक्रोशीत कुप्रसिद्ध झाले तर शहरांच्या व्यापार उदीम हळूहळू उतरणीला लागून शहर बकाल व भकास होण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी व्‍यक्‍त केली आहे.