‘लव्ह जिहाद’ कायदा लागू करा, मागणीसाठी अहमदनगरला भव्य मोर्चा

0
308

अहमदनगर, दि. १४ (पीसीबी) : शिंदे फडणवीस सरकारने राज्यात ‘लव्ह जिहाद’ कायदा लागू करण्याबाबत जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या कायद्यावरुन सत्ताधारी विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. पण आता अहमदनगर येथे ‘लव्ह जिहाद धर्मांतरण’विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा या मागणीसाठी हिंदू जनजागरण आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.
अहमदनगर येथे ‘लव्ह जिहाद धर्मांतरण’विरोधी कायद्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आहेत. माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा सुरू झाला आहे.

मोर्चाचा समारोप दुपारी एक वाजता दिल्लीगेट येथील सभेने होणार आहे. या मोर्चाला कालीपुत्र कालीचरण महाराज उपस्थित आहेत.
लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची सरकारची तयारी सुरु आहे अशा चर्चांना उधाण आलं आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचा प्रयत्न सुरु आहे.