लवकरच महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल

0
388

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : काल द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून यावेळी संपूर्ण देश मुर्मूंकडे आशेने पाहतोय. घटनेची पायमल्ली होऊ नये ही जबाबदारी राष्ट्रपतींची असल्याचं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर तुम्हाला लवकरच महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

शिवसेनच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा लावल्या जात आहेत. आम्ही शिवसेनेसोबत आहोत असं शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. लवकरच तुम्हाला महाराष्ट्राचं वातावरण शिवसेनामय झालेलं दिसेलं असं संजय राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती राऊतांनी दिली आहे.

देशभरातून राष्ट्रपतीपदासाठी मतदान झालं त्यामध्ये शिवसेनेचा खारीचा वाटा आहे याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच घटनेची पायमल्ली होऊ नये हे काम राष्ट्रपतींनी केलं पाहिजे, त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग होत आहे. राजकीय दबावातून सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याच्या विरोधात अशा कारवाया केंद्र सरकारकडून केल्या जात आहेत अशी माहिती राऊतांनी दिलेली आहे.

दरम्यान, काल राष्ट्रपतीपदाची मतमोजणी पार पडली. यावेळी शिवसेनेने विरोधात असूनसुद्धा एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी ६ ऑगस्ट रोजी निवडणुका पार पडणार आहेत. त्यामध्ये भाजपकडून जयदीप धनखड आणि विरोधीपक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.