मुंबई, दि. १२ (पीसीबी) – मागील वर्षी जून महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी एक टि्वट केलं आहे. त्यात त्यांनी एकप्रकारे भाजपचा पुढचा प्लॅनच सांगितला आहे. मात्र, या टि्वटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दमानिया म्हणाल्या, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत, तेही लवकरच. बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मागील आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं होतं.
“किळसवाणं राजकारण…”
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट केला आहे आणि “किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन” असं कॅप्शन अंजली दमानिया यांनी दिलं आहे. त्यामुळे अजितदादा नॉट रिचेबल अशा बातम्यांना आणि चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.
अजित पवार भाजपसाठी पूरक…
अंजली दमानिया म्हणाल्या, आतापर्यंत आठ ते 10 पत्रकारांशी बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार हे भाजप(BJP)ला सॉफ्ट आहेत. ते विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक नाही. ते भाजपला पुरक भूमिका घेतात. असंही सांगितलं जातंय की, 23 जणांच्या सह्या झाल्या आहेत. याला काय म्हणायचं? या सर्व संकेतामुळे मी ट्विट केलं असंही दमानिया यांनी सांगितलं.