ललित मोदीच्या आश्रयाचे दरवाजे बंद; पासपोर्ट रद्द करण्याचे वानूआतूच्या पंतप्रधानांचे निर्देश

0
11

दि . ११ ( पीसीबी ) – इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) माजी संस्थापक ललित मोदी प्रत्यार्पण टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे नमूद करत, त्याला जारी केलेला पासपोर्ट रद्द करण्याचे निर्देश वानूआतूचे पंतप्रधान जोथम नापट यांनी सोमवारी नागरिकत्व आयोगाला दिले.

‘आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर मी नागरिकत्व आयोगाला ललित मोदीला जारी करण्यात आलेला वानूआतूचा पासपोर्ट रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत’, असे वानूआतू प्रजासत्ताकाने पंतप्रधान नापट यांच्या वतीने जारी दिलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘ललित मोदीने पासपोर्टसाठी अर्ज केला तेव्हा इंटरपोल तपासणीसह सर्व आवश्यक चौकशी करण्यात आली. मात्र, त्यावेळी कोणताही गुन्हेगारी दोष आढळला नाही. मात्र, ठोस न्यायालयीन पुराव्यांअभावी त्याच्याविरुद्ध अॅलर्ट नोटीस जारी करण्याच्या भारतीय अधिकाऱ्यांच्या विनंतीला इंटरपोलने दोनदा नकार दिल्याची माहिती मला मागील २४ तासांत माहिती मिळाली.
अशा कोणत्याही ‘ॲलर्ट’मुळे त्याचा नागरिकत्व अर्ज आपोआप नाकारला गेला असता’, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. अलीकडे उघडकीस आलेल्या तथ्यांवरून प्रत्यार्पण टाळणे हाच त्याचा पासपोर्टसाठी अर्ज करण्यामागील हेतू होता असे स्पष्टपणे दिसून येते असल्याचे नमूद करत, वानूआतूचा पासपोर्ट मिळवणे हा एक विशेषाधिकार आहे, अधिकार नाही. अर्जदारांनी नागरिकत्वाकरिता वैध कारणांसाठी अर्ज करावा, यावरही पंतप्रधान नापट यांनी भर दिला आहे.

दरम्यान, ललित मोदीशी संबंधित प्रकरणाच्या काही तपशिलांसह भारताने वानूआतू सरकारला त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केली होती, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिली.
ललित मोदीने ७ मार्च रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्याने दक्षिण प्रशांत महासागतील एक छोटासा देश असलेल्या वानूआतूचे नागरिकत्व घेतले. मात्र, २०१०मध्ये भारतातून पळून गेलेला ललित मोदी सध्या लंडनमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते.