ललित पाटील ड्रग प्रकरणातरोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना पोलिसांच्या ताब्यात

0
365

पुणे, दि. २६ (पीसीबी) – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पलायन करण्यास मदत केल्याच्या संशयावरून पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

विनय अऱ्हाना याने पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बॅंकेतून २० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन ती रक्कम इतर कामासाठी वापरल्याच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अऱ्हानाला अटक केली होती. येरवडा कारागृहात असताना त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी वॉर्ड क्रमांक १६ मध्ये ललित आणि अऱ्हाना यांची ओळख झाली.या ओळखीतून अऱ्हानाने ललितला पळून जाण्यास मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी अऱ्हानाचा ताबा घेण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता.

न्यायालयाने पोलिसांना येरवडा कारागृहातून अऱ्हानाचा ताबा घेण्याची परवानगी दिली आहे. तर ललित सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे.

ससूनमधून असा पळाला ललित पाटीलललित ससून रुग्णालयामधून पळाल्यानंतर तो काही अंतरावर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला. तेथून तो रिक्षाने सोमवार पेठेत गेला. त्याठिकाणी दत्ता डोके हा ललितला घेऊन जाण्यासाठी मोटार घेऊन थांबला होता. ही मोटार डोकेच्या नावावर आहे. परंतु तो अऱ्हानाकडे चालक म्हणून कामास आहे.या मोटारीतून ललित रावेतला पोचला. तेथे डोके याने अऱ्हानाच्या सांगण्यावरुन ललितला १० हजार रुपये दिले. ते पैसे घेऊन ललित पहिल्यांदा मुंबईला गेला. तेथून नाशिकला गेल्यानंतर मैत्रिणीकडून २५ लाख रुपये घेऊन तो पसार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.