ललित पाटील चौकशी अहवाल ही नौटंकी, तो १७ लाख कोणाला देत होता – आमदार रविंद्र धंगेकर

0
345

पुणे,दि.११(पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ललित पाटील ड्रग्ज तस्करी प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी शुक्रवारी विभागीय चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. यानंतर ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना बडतर्फ करण्यात आलं आहे, तर अन्य एका वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. या सर्व घडामोडींवर पुण्याच्या कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया केली आहे. ललित पाटलाकडून पोलीस आयुक्त कार्यालयाला हफ्ते दिले जात होते, असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “ललित पाटीलने कालच (शुक्रवार, १० नोव्हेंबर) सांगितलं की, मी १७ लाख रुपये देत होतो. ज्यांना ज्यांना पैसे दिले, त्यांची पोलिसांनी चौकशी केली नाही. मी दोन दिवसांपूर्वी तपास अधिकाऱ्यांना भेटलो आणि सांगितलं की, आरोपी अधिकाऱ्यांकडून रकमेची वसुली करा आणि त्यांना अटक करा. काल शासनाचा अहवाल आला आणि त्यामध्ये ललित पाटील प्रकरणात ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केलं आहे. पण तो अहवाल एक नौटंकी आहे. संजीव ठाकुरांना वाचवण्याचं काम सरकार करत आहे. खरं तर, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, याची मागणी मी वारंवार करत आहे.”

“ललित पाटील प्रकरणी पोलीस व्यवस्थित चौकशी करत नाहीयेत. पोलीस खातं गृहमंत्र्यांच्या आणि शासनााच्य दबावाखाली काम करतंय. पुण्यात हुक्का पार्लर, ड्रग्ज आणि अमली पदार्थांचे धंदे राजरोसपणे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरूआहेत. हे मी सातत्याने बोलतोय. यावर पडदा टाकण्यासाठी पोलीस संजीव ठाकूर यांना अटक करत नाहीयेत. आज लाखो रुपये आयुक्त कार्यालयात हफ्त्याच्या रुपाने गोळा होतात. हे जर ऐकले नाहीत, तर आम्ही लोकशाही पद्धतीने जे काही करता येईल ते करू”, असंही रवींद्र धंगेकर म्हणाले.