राजस्थान दि. ११ (पीसीबी) : दुभत्या जनावरांमध्येही हा विषाणू वेगाने पसरत असल्याबद्दल लोकांमध्ये चिंता वाढत आहे. हा विषाणू मानवांमध्ये देखील पसरू शकतो का याबाबत लोकांमध्ये चिंता आहे. कारण दूध हे राजस्थानात सर्वात जास्त वापरले जाणारे पेय आहे. लोकसभेतही हे प्रकरण गाजले. राजस्थानकडून मदतीचा प्रस्ताव आला नसल्याचे केंद्राने म्हटले आहे.
सतर्क रहा : सीएम गेहलोत
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य आहे, प्राणी मालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
मानवांमध्ये पसरत नाही : डॉ राजोरिया
पॉलीक्लिनिकचे संचालक डॉ. जितेंद्र राजोरिया आणि एसएमएस हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर डॉ. रमण शर्मा यांनी सांगितले की, लम्पी हा विषाणूजन्य आजार आहे, जो डास आणि कीटक चावल्यामुळे, संक्रमित जनावरांच्या संपर्कामुळे होतो. यामुळे दुभत्या जनावरांचे दूध झपाट्याने कमी होते किंवा ते दूध देणे बंद करतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने त्याचा संसर्ग मानवांमध्ये पसरत नाही.
दूध उकळून प्या
डॉ. राजोरिया म्हणाले की, संसर्ग झालेल्या जनावराच्या दुधात विषाणू आढळून आल्याची कोणतीही माहिती अद्याप झालेली नाही. परंतू खबरदारीचा उपाय म्हणून दूध उकळूनच प्यावे. डॉ. रमण शर्मा यांनी सांगितले की, मानवामध्ये लम्पीसारखा कोणताही विषाणू नाही. मानवांमध्ये त्याचा प्रसार झाल्याची अशी कोणतीही घटना घडलेली नाही.