लपाछपी खेळताना फास लागून चिमुकलीचा गेला जीव

0
72

30 जुलै (पीसीबी) – मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये एक हृदय पिळवटणारी घटना समोर आली आहे. भावडांसोबत खेळत असताना एका 7 वर्षांच्या मुलीला दोरीचा फास लागला. भावडांना ही बाब लक्षात येईपर्यंत उशीर झाला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. घटनेवेळी कोणीही वडीलधारी मंडळी घरात नव्हती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. थोड्यावेळापूर्वी आपल्याशी दंगा करणारी बहिण गेल्याने भावडांना मोठा धक्का बसला.

काळाने साधला डाव

रविवार असल्याने मुलांचा दंगा सुरु होता. घरातील वडीलधारी मंडळी बाहेर असल्याने इतर मुलांसोबत त्यांची मस्ती सुरु होती. बैंगवाडी येथे रविवारी दुपारी बाराच्या सुमारास आकृती सिंह ही तिची भावंडे आणि शेजारील एका मुलीबरोबर लपाछपी खेळत होती. लपाछपीचा डाव रंगला होता. त्याचवेळी खेळताना दोरीचा फास लागून तिचा मृत्यू झाला. ही घटना गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे.