लग्नाच्या आमिषाने सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार

0
190

हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) – एकाच कंपनीत काम करत असताना सहकारी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिचे क्रेडिट कार्ड वापरून पैशांचा अपहार केला. तिच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत हिंजवडी परिसरात घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने ३ मार्च रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुनिष शर्मा व शुभम शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि मुनिष हे एकाच कंपनीत काम करत होते. तिथे फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादीचे क्रेडिट कार्ड वापरून त्यावरून ६० हजार रुपये खर्च केले. फिर्यादीस हाताने मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या हाताला चावा घेऊन दुखापत पोहोचवली. मुनिष याचा भाऊ शुभम याने फिर्यादी बद्दल सोशल मीडियावर अश्लील पोस्ट केली. फिर्यादीस आणि त्यांच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.