लग्नाचे वचन मोडल्याने ‘त्या’ महिलेचा खून

0
367

डोक्यात दगड घालून महिलेचा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी आळंदी येथे उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिलेने लग्नाचे वचन मोडल्याने तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ज्ञानेश्वर गजानन इंगाले (वय 31, रा. इंद्रायणी घाट, आळंदी देवाची. मूळ रा. कुटी पांगरी, ता. मालेगाव, वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खून झालेल्या महिलेची ओळख पटली नाही. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घुले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी मधील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आढळला. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक केली. आरोपी हा मुळचा वाशिम जिल्ह्यातील असून तो कामानिमित्त आळंदी येथे मागील दोन ते अडीच वर्षांपासून आला होता. तो मिळेल ते मजुरीचे काम करून आळंदी घाटावरच झोपत असे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून एक महिला देखील आळंदी घाटावर वास्तव्यास आली होती.

आरोपी ज्ञानेश्वर इंगाले याची त्या महिलेसोबत ओळख झाली. खुनाच्या घटनेच्या आदल्या दिवशी दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच दिवशी ती महिला एका अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली. त्यामुळे महिलेवर संशय आल्याने ज्ञानेश्वर इंगाले याने महिलेच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून तिचा खून केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.