लखीचंद ज्वेलर्सने १२८४ किलो सोन्यावर घेतले कोट्यवधींचे कर्ज; ईडीच्या छाप्यात सापडले फक्त…

0
733

जळगाव,दि.२२(पीसीबी) – जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलोंची सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे. ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि पक्षाचे खजिनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईचा संबंध शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वादाशी जोडला जात आहे.

मात्र, या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला तेव्हा त्याठिकाणी खूप मोठ्याप्रमाणात सोन्याचा साठा असेल, असा अंदाज होता. मात्र, ईडीच्या या कारवाईत १३०० किलोपैकी फक्त ४० किलोच सोने हाती लागल्याची माहिती आहे. ईडीने ईश्वरलाल जैन यांच्या संपत्तीचा तपशील तपासला होता. यावेळी त्यांच्या तीन ज्वेलरी कंपन्यांकडून बोगस व्यवहारांच्या नावाखाली पैशांची अफरातफर होत असल्याचा संशय आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात सीबीआयकडून राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर.एल. गोल्ड आणि मनराज ज्वेलर्स या कंपन्या आणि त्यांचे प्रवर्तक असलेले ईश्वरलाल जैन, मनिष जैन आणि त्यांच्या अन्य कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या आरोपींनी स्टेट बँकेकडून ३५३ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन हप्ते थकवल्याचा आरोप आहे. सीबीआयने नोंदविलेल्या या गुन्ह्याच्या आधारे ईडीने ईश्वरलाल जैन यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवला.

ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापा टाकला तेव्हा सोन्याचा बरासचा साठा त्याठिकाणी आढळला नाही. लखीचंद ज्वेलर्सने त्यांच्याकडे बँकेकडून कर्ज घेताना १२८४ किलो सोन्याचे दागिने असल्याची माहिती जाहीर केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्याठिकाणी केवळ ४० किलो सोन्याचेच दागिने सापडले. त्यामुळे बँकेकडून कर्जापोटी घेतलेल्या ३५३ कोटी खोटे खरेदी व्यवहार दाखवून इतरत्र वळवण्यात आले, असे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राजमल लखीचंद ज्वेलर्स, आर.एल. गोल्ड आणि मनराज ज्वेलर्स या तिन्ही कंपन्यांच्या प्रवर्तकांना बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग नेमका कुठे करण्यात आला, याबद्दल कोणतीही कागदपत्रे सादर करता आलेली नाहीत. त्यामुळे ईश्वरलाल जैन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.