लक्ष्मण ढोबळे यांंची कन्या कोमल ढोबळे यांना बीआरएस कडून लोकसभेची ऑफर

0
741

सोलापूर, दि. २४ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल ढोबळे यांच्या संपर्कात बीआरएसचे नेते आहेत. बीआरएसकडून त्यांना सोलापूर लोकसभा उमेदवारीची ऑफर असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपुरातील कार्यक्रमात विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांच्या नावाबाबत संकेत दिले होते. त्यानंतर भगीरथ भालके यांच्यावर राष्ट्रवादी सोडण्याबाबत समर्थकांकडून दबाव टाकण्यात आला. त्यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांनी स्टार प्रचारक म्हणून भूमिका बजावली.

भगीरथ भालके बीआरएसच्या वाटेवर असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे, त्यामुळे संभाव्य २०२४ ची विधानसभा ते बीआरएसकडून लढू शकतात. मात्र, सोलापूर लोकसभेचे भाजपचे विद्यमान खासदाराबाबत मतदारसंघात नाराजी आहे. त्या नाराजीचा फायदा उठवण्याची काँग्रेसला मोठी संधी आहे. मात्र, काँग्रेसकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

अशा परिस्थितीत सोलापूर लोकसभेची निवडणूक बीआरएसने लढवण्याचे निश्चित केले, तर या राखीव जागेसाठी आक्रमक आणि जनमानसामध्ये ओळख असलेला चेहरा देण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होऊ शकतो. अॅड कोमल साळुंखे यांनी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम केले आहे. टोलनाक्याच्या प्रश्नासोबतच महिलांचे प्रश्न मांडण्यातही त्या आग्रही आहेत.

बीआरपीच्या माध्यमातून दलित समाजासाठी कल्याणकारी योजना राबवताना त्यांनी कायमस्वरूपी समाज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा, यासाठी काम केले आहे. बीआरएस पक्षाची ध्येय धोरणेही शोषित वंचितांच्या विकासासाठी अनुकूल अशीच आहेत. सोलापूर शहरात हैदराबाद तेलंगणा भागातील असणारा मतदार, पंढरपूर-मंगळवेढा भागात ढोबळेंचा असलेला जनसंपर्क, मोहोळ या ठिकाणी शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असलेली जाळे सोबत भालकेंचा राजकीय उपयोग नाकारता येणार नाही.