लक्ष्मण जगताप प्रकृतीशी झुंज देत असतानाच भाजपकडून पोटनिवडणुकीची तयारी- सुनील शेळके

0
199

पिंपरी दि. ३१ (पीसीबी) – भाजपने आमदार लक्ष्मण जगताप हे हयात असताना व प्रकृतीशी झुंज देत असताना चिंचवड विधानसभेत पोट निवडणूक लागणार या दृष्टीने पोटनिवडणुकीची तयारी चालू केलेली होती. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे राजकारण करणे हे कुठल्या राजकीय संस्कृतीला धरून आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर केला.

चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मासिक बैठक शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चिंचवड विधानसभेचे निरीक्षक आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आज (सोमवारी) पार पडली. आमदार शेळके यांनी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.

आमदार शेळके म्हणाले, राष्ट्रवादी हाच चिंचवड विधानसभेच्या उमेदवारीसाठी पोट निवडणुकीत नैसर्गिक दावेदार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होईल . तसेच गेले 3 दशके राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या शहराचा कायापालट केलेला आहे. अनेक कार्यकर्त्यांची मोठी फळी घडवलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदार या शहरात व चिंचवड मतदार संघात मोठ्या संख्येने आहे, म्हणून ही जागा राष्ट्रवादीलाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तरीही महाविकास आघाडीतील शिर्षस्थ नेते अंतिम निर्णय घेतील असेही त्यांनी म्हटले आहे.

अजित गव्हाणे म्हणाले, येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात उत्साह भरला आहे. ज्याप्रमाणे मावळची निवडणूक सुनील शेळके यांनी प्रचंड मताधिक्याने जिंकली तसेच चिंचवड निवडणुकीत देखील विजय मिळवायचा आहे.

युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, मयूर कलाटे, पंकज भालेकर, विनोद नढे, राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, अरुण बोराडे , फजल शेख, प्रदेश सरचिटणीस विशाल वाकडकर, विशाल काळभोर, प्रशांत सपकाळ, चिंचवड विधानसभेचे कार्याध्यक्ष श्याम जगताप, तानाजी जवळकर, स्वीकृत सदस्य शिवाजी पाडुळे, पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभेतील आजी माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.