रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
68

महाळुंगे, दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) -विद्युत रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीकडून 340 किलो तांब्याच्या तारा व पट्ट्यांसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीचा माल विकत घेणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

रमेश उर्फ राहुल बाळु पडवळ (वय 27, रा. निमगाव दावडी, ता. खेड), सुनिल उर्फ सैराट शिवाजी गावडे (वय 21, रा. निमगाव दावडी, ता. खेड), सुनिल सुरेश गावडे (वय 23, रा. खडकी पिपळगाव, ता. आंबेगाव), रविद्र सुरेश गावडे (वय 23, रा. खडकी पिंपळगाव, ता. आंबेगाव), उस्मान बिलाल अब्दुल अब्बुहरेरा (वय 20, रा. हन्टसमन चौक, भांबोली, ता. खेड), कार्तिक नामदेव पवार (वय 25, रा. राक्षेवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागात शेती व नविन औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग मार्फत विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) उभारण्यात आले आहेत. त्यातील तांब्याच्या तारा आणि कॉईल चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी व औद्योगिक वसाहतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.

विद्युत रोहित्र चोरीची ठीकाणे ग्रामीण व दुर्गम भागातील निर्जन जागेत आहेत. त्यामुळे चोरीच्या घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळून येत नव्हते. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यामध्ये तपास पथकांना अडचणी येत होत्या. सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे यांच्या पथकाने तांत्रिक बाबींची पडताळणी करून काही संशयतांना ताब्यात घेतले.

त्यांनी विद्युत रोहित्रामधील तांब्यांच्या तारा चोरल्याची कबुली दिली. आरोपींकडून विद्युत रोहित्रामधील तांब्याचे तारा व पट्टया, रोहित्र खोलण्यासाठी वापरलेले साहित्य-लहान मोठ्या आकाराचे पाने, पक्कड, हातोडी, तसेच गुन्हयासाठी वापरेली वाहने, इंडीका कार व इतर चोरलेल्या दुचाकी, 340 किलो तांब्याच्या तारा व पट्ट्या असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रमेश पडवळ याच्यावर अहमदनगर व पुणे जिल्हातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये चोरीचे 16 गुन्हे दाखल आहेत. आरोपी सुनिल उर्फ सैराट शिवाजी गावडे याच्यावर चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी सुनिल गावडे याच्यावर चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.विद्युत रोहित चोरी प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल आहेत. हे सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. यासह महाळुंगे एमआयडीसी, चाकण आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे तीन गुन्हे देखील उघडकीस आले आहेत.

अशी करायचे चोरी

आरोपी निर्जन व दुर्गम भागात असलेल्या शेती तसेच नवीन तयार होत असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी उभारण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर हेरत असत. रात्रीच्या वेळी ट्रान्सफॉर्मरच्या डिओचा खटका बंद करून त्यातील विद्युत कनेक्शन डिस्कनेक्ट केले जात. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर बॉक्स खाली पाडून ऑइल थंड झाल्यानंतर त्यातील तांब्याच्या तारा चोरल्या जात.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-3) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (चाकण विभाग) राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजु कोणकेरी, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, अमोल बोराटे, प्रकाश चाफळे, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर, अमोल माटे, मंगेश कदम, शरद खैरे, राजु जाधव यांनी केली आहे.