रोहित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे फलक पुणे-मुंबई महामार्गावर

0
308

पुणे,दि.२४(पीसीबी) – आमदार रोहित पवार यांचे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स लागले असून यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. मॅजिक फिगर १४५ हा आकडा असतो. तो गाठल्याशिवाय कुणी मुख्यमंत्री होत नाही. केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहतं. अजित पवार हे आज दिवसभर पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते ४० गणपती मंडळाच्या आरती आणि काही उद्घाटने होणार आहेत.

आमदार रोहित पवार यांचे पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील उर्से टोलनाका या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले आहेत. यावर अजित पवार यांनी बोलताना म्हटलं, मुख्यमंत्री व्हायचं कोण शिल्लकच राहणार नाही, सर्वजण आपापले फ्लेक्स लावत आहेत. माझे फ्लेक्स लागले तेव्हा कार्यकर्त्यांना पाठीमागे सांगितल होतं की असे फ्लेक्स लावून काही उपयोग होत नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळतं. कुणी कोणाचे फ्लेक्स लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे मॅजिक फिगर १४५ चा आकडा आहे तोच मुख्यमंत्री होतो अन्यथा केवळ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न राहते.

गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. हा प्रश्न विचारताच अजित पवारांनी असल्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. असं म्हणत गोपीचंद पडळकर यांना फार काही महत्त्व दिलं नाही. महाराष्ट्रात वाचाळ विरांची संख्या वाढलेली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आपण बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती किंवा परंपरा नाही, असं देखील अजित पवारांनी म्हटलं. मराठा आरक्षण हे महत्त्वाचं आहे. मागच्या सरकारनेदेखील मराठा आरक्षणाविषयी प्रयत्न केले. परंतु, ते हायकोर्टात टिकले नाही, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आलं. त्यांचं मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं. परंतु, ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्यामुळे आता कायद्याच्या चौकटीत राहून आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणासंबंधी हे सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाविषयीदेखील अजित पवार यांनी भाष्य करत याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. तो समाजदेखील महत्त्वाचा घटक आहे. यासंबंधी आम्ही बैठक घेऊन निर्णय घेऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं.