मोशी, दि. ७ (पीसीबी) : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. काल पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या झाली, त्यातील गुन्हेगारांना तातडीनं अटक करण्यात आली, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली. “रोहित पवारच्या प्रश्नाला उत्तर द्यावं, इतका तो मोठा झालेला नाही. तो बच्चा आहे, माझे प्रवक्ते त्यावर बोलतील”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आमदार कांबळे यांनी माझ्या समोर कोणाला मारलं असतं तर मी शांत बसलो असतो का? मी पुढच्या कार्यक्रमाच्या घाईत होतो. त्यामुळं राष्ट्रगीत होताच बाहेर पडलो.”
राज्याचे मुख्यमंत्री हे १०० व्या नाट्य परिषदेला प्रमुख होते. मी त्यांच्या अडचणी नेहमी सोडवतो. माझी जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडतो. साहित्य संमेलन, नाट्य परिषद असेल पूर्वीचे नेते अगदी यशवंतराव चव्हाण हे खाली म्हणजे मंचाच्या समोर बसायचे. आजच्या १०० व्या नाट्य संमेलनावेळी मी वेगळ्या कार्यक्रमात होतो. शरद पवार तिथं होते म्हणून मी आलो नाही, असं काही नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये शरद पवार असताना मी तिथं जातोच. उगाचंच काहीही गैरसमज पसरवू नका, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.