रोझलँड सोसायटीच्या ‘सायकल डोनेशन उपक्रमाला’ उन्नती सोशल फाऊंडेशनचे ‘पाठबळ’ : जमा झालेल्या सायकलींच्या दुरुस्ती खर्चाला उन्नती सोशल फाऊंडेशनचा हातभार.

0
38

पिंपळे सौदागर, दि. १ (पीसीबी) : पिंपळे सौदागर येथील सामाजिक उपक्रमांत आघाडीवर असलेल्या रोझलँड सोसायटी , यांच्या वतीने दीपावली निमित्त सायकल डोनेशन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. चंदन चौरसिया आणि धवल प्रजापती यांनी ज्येष्ठ नागरिक विजय मुळकर यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांना सध्या वापरात नसलेल्या सायकल या माध्यमातून डोनेट करण्यात येणार आहेत. या जमा झालेल्या सायकलच्या आवश्यक असलेल्या दुरुस्तीचा खर्चाला उन्नती सोशल फाउंडेशनने हातभार लावला आहे. त्यामुळे , एका चांगल्या सामाजिक उद्देशाने काम करणाऱ्या रहिवासी सोसायटीला ‘उन्नती’ चे बळ मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.

रोझलँड सोसायटी येथे आज , उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे आणि संस्थापक श्री.संजय तात्याबा भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल दुरुस्तीसाठीच्या रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या , “आपल्या ताटातले अधिकचे दुसऱ्याला देणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. सध्या वापरात नसलेल्या सायकली ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना , ज्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागते अशा विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहेत . सध्याच्या धावपळीच्या जगात सायकल चालविणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. मात्र काही कारणांमुळे सायकल वापरणे अथवा ती दैनंदिन चालविणे शक्य होत नाही. आज आपण बऱ्याच रहिवासी सोसायट्यांमध्ये आपण अडगळीत आणि धूळ खात पडलेल्या सायकली पाहतो. याच वापरात नसलेल्या अथवा नादुरुस्त असलेल्या सायकली आज गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत याचा आम्हा सर्वांना मनस्वी आनंद वाटतो. या चांगल्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी रोझलँड सोसायटीने उन्नती सोशल फाऊंडेशनला दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण पिंपळे सौदागर मधील इतर अनेक रहिवासी सोसायटी यांनी करायला हवे.! असा आग्रह देखील या निमित्ताने व्यक्त करते.”

याप्रसंगी , रोझलँड रहिवासी सोसायटीचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप ठेंगे , सचिव विनीत सक्सेना , उपाध्यक्ष विक्रम शिंदे , सदस्य सखाराम देशपांडे, नरेंद्र अहिरे यांच्यासह रोझलँड सोसायटी मधील सर्व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.