रेशनिंग बंद झालं, आर्थिक प्रगती खुंटली… करणी केल्याच्या रागातून तरूणाने केला वृद्धाचा खून

0
11

भोर, दि. २६ (पीसीबी) : पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातवे गावतील एका व्यक्तीचा खून झाल्याने एकच खळबळ माजली. गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावरील पुलाजवळ त्या इसमाची मोटारसायकल सुरक्षा कठड्याला लटकताना दिसली. तर त्या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

अखेर कसून तपास केल्यानंतर याप्रकरणी एका 30 वर्षांच्या इसमाला अटक करण्यात आली. मृत इसमाने आपल्यावर करणी केली, त्यामुळे रेशनिंग मिळण्याचे बंद झाले आणि आर्थिक प्रगती खुंटली, या गैरसमजातून, रागातून पण त्या इसमाची हत्या केल्याचे आरोपीने कबूल केले. गणपत गेनबा खुटवड असे मृत इसमाचे नाव तर स्वप्निल जानोबा खुटवड असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

गणपत गेनबा खुटवड हे रोजच्या प्रमाणे रविवार २२ सप्टेंबरच्या रात्री नसरापूर येथून आपल्या घरी यायला निघाले. रात्रीची वेळ होती. पुढे जाऊन आपल्या बरोबर एक भयानक प्रसंग घडणार असून आपल्यासाठी ही काळ रात्र ठरणार आहे, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. गणपत खुटवड हे दुचाकीवरून हातवे बु. येथील गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावरील पुलाजवळ पोहोचले आणि तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्याठिकाणी नक्की काय घडले ? कशामुळे घडले ? याबाबत कोणालाही कसलीच माहिती नव्हती.

यादरम्यान त्याच रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांचे पुतणे संदीप खुटवड यांना फोन आला की, मयत गणपत खुटवड यांची मोटारसायकल ही हातवे बु. येथील बंधाऱ्याच्या सुरक्षा कठड्याला लटकताना दिसत आहे. त्यानंतर संदीप खुटवड यांनी नातेवाईक व गावातील काही ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना गणपत खुटवड यांचा मृतदेह बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस नदी पात्रात आढळून आला. गणपत यांच्या डोक्यास मार लागून त्यामधून रक्त येत असल्याचे दिसले.

यावेळी स्वप्निल खुटवड म्हणाला की, “मयत गणपत खुटवड हे काळुबाई देवीचे देवऋषी असून त्यांचे रेशनिंगचे दुकान आहे. त्यांनी मला करणी केली आहे. त्यामुळे माझे रेशनिंग मिळण्याचे बंद झाले असून माझी आर्थिक प्रगती होत नाही. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबाबत राग होता. त्यामुळे मी त्यांचा पाठलाग करून गुंजवणी नदीच्या पुलाजवळ त्यांना अडवून डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यांचा खून केला व त्यांचा मृतदेह नदीपात्रात टाकून दिला. आणि हा अपघात वाटावा म्हणून त्यांची मोटार सायकल पुलावर सुरक्षा कठड्यालगत अडकवून ठेवली.” असे सांगून स्वप्निलने शेवटी गैरसमजातून खून केल्याचे कबूल केले. स्वप्निल उर्फ बंटी खुटवड यास बुधवारी भोर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.