रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
343
पिंपरी दि. १९ (पीसीबी) – रेल्वे रुळाजवळ सेल्फी घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. सेल्फी घेत असताना रेल्वेचा धक्का लागून तरुण गंभीर जखमी झाला. त्यातच उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.
अनिल कुमार ध्रुव (वय २०, रा. छत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रेल्वे पोलीस मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १६) दुपारी साडेपाच वाजता अनिल ध्रुव आणि त्याचा चुलत भाऊ चैन सिंह ध्रुव हे आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ वीटभट्टी परिसरात रेल्वे रुळावर फिरत होते. रुळाजवळ उभे राहून अनिल ध्रुव हा त्याचा फोटो काढत होता. फोटो काढत असताना अज्ञात रेल्वेचा अनिलला धक्का बसला. त्यात अनिल रेल्वे रुळावर पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्याचा चुलत भाऊ चैन सिंह आणि त्याच्या मित्रांनी अनिलला तात्काळ उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह छत्तीसगड येथील मूळ गावी पाठवण्यात आला आहे.