रॅपीडोवर गुन्हा दाखल ; रिक्षा संघटनांच्या आंदोलनाचे यश : बाबा कांबळे.

0
199

लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊ :- नाना भानगिरे

पुणे, दि. २८ (पीसीबी) – बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी \व्यवसाय करणाऱ्या रॅपीडो कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून दिलेल्या लढ्याचे हे यश असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

जय महाराष्ट्र रिक्षा संघटना वतीने हडपसर येथील काळे बोराटेनगर रेल्वे गेट येथे रिक्षा चालक-मालकांच्या शाखेचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी बाबा कांबळे बोलत होते. या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे,महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे,संतोष राजपूत, कपिल काळे, मारुती आबा तुपे, पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख, कार्याध्यक्ष विलास खेमसे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने देशभरामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यावरती आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर २० तारखेला विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी बेकायदेशीर टू व्हीलर वरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यांनी शासनाचा कर बुडवला ही बाब निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याला यश आले आहे. या पुढे मोबाईल अप्लिकेशन मधून हे ऍप रद्द करावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. शांततेच्या लोकशाहीच्या मार्गाने देखील आंदोलन यशस्वी होऊ शकतो हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आमचा भारतीय संविधानावरती विश्वास असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या आधारे व संविधानाच्या आधारे आम्ही हा लढा पुढे घेऊन जात आहोत आम्हाला यश येत असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

नाना भानगरे म्हणाले आम्ही रिक्षा चालक मालकांच्या बाजूने असून पुणे शहरातील रिक्षा चालक-मालकांचे प्रश्न सोडण्यासाठी बाळासाहेबांचे शिवसेना हा पक्ष प्रयत्न करत आहे, महाराष्ट्रामधील परवानगी नाही सरकार तुमच्यासोबत आहे, लवकरच या प्रश्नांवरती मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊन उर्वरित प्रश्न देखील सोडू असे शिवसेना शहर प्रमुख नानासाहेब भांनगिरे म्हणाले

रिक्षा चालकांच्यावर गुन्हे दाखल होण्याला बोगस संघटना जबाबदार –

काही बोगस संघटनेने 28 तारखेला माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला असता तर 28 ला हा निर्णय झाला असता. परंतु या बोगस संघटनांना बाईक टॅक्सी बंद करायचे नसून त्यांना या कंपन्यांना मदत करायची असल्याचे दिसते. त्यामुळे बोगस संघटनेचे आंदोलन भरकटले. त्यांच्यामुळे रिक्षा चालकावरती गुन्हा दाखल झाले आहे. त्यांना जेलमध्ये जावे लागले. याला संपूर्ण बोगस संघटना व त्याचे बोगस नेते जबाबदार आहेत, असे बाबा कांबळे म्हणाले.

कार्यक्रमाचे संयोजन जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गुलाब सय्यद, आप्पा हिरेमठ, बाळासाहेब विटकर, अंकुश ओव्हाळ, चंद्रकांत शिवरकर, बालाजी वजरे, राजमल कुमावत यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले.