रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट, दोघांना अटक

0
32

पुणे, दि. १४ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. रूपाली चाकणकर यांच्यावतीने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अश्लील पोस्ट करणाऱ्या 32 जणांची लिस्ट सायबर क्राईमला देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या दोघांवर कलम 72/ 2024, कलम 354 ड, 509, 34 या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. सन्नी पारखे याला गंगापूर येथून तर हाटे याला चुनाभट्टी मुंबई येथून अटक केली आहे.

याआधीही रुपाली चाकणकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लील मजकूर
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी समाजमाध्यमात अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले होते. सोशल मीडिया पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट केलेल्या फेसबुक युजर नावाचे अकाऊंट असलेल्या संशयित व्यक्तीची फेसबुक कंपनीकडून तांत्रिक माहिती घेण्यात आली. पोलिसांनी वसंत रमेशराव खुळे (वय-34 रा. रहाटी, ता.जि. परभणी) याचा शोध घेतला असता आरोप रहाटी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने रहाटी येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याला सायबर पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवून घेत फोन जप्त केला. त्याला सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस देण्यात आली होती.

याशिवाय फेसबुक युजर प्रदीप कणसे नावाने पोस्टवर अश्लील भाषेत कमेंट करण्यात आली होती. पोलिसांनी हे फेसबुक अकाउंट वापरणाऱ्या संशयिताचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याला देखील सी.आर.पी.सी प्रमाणे नोटीस दिली आहे. सायबर पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर अश्लील पोस्ट करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्यांचा माग काढून गुन्हा उघडकीस आणला होता.