रुपाली चाकणकर यांच्या पदावर गदा, महाआघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला

0
25

(दिनांक : ०३ जून २०२५) वैष्णवी हगवणे प्रकरणावरून राज्य महिला आयोगाच्या काराभारावर चहूबाजूने टीका होत आहे. त्यामुळं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आल्या आहेत. विरोधकांसह पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीदेखील त्यांना धारेवर धरलं आहे. तसेच, चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर महायुतीत मित्रपक्ष देखील नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कारभाराची झाडाझडती होणार आहे. तसेच, काही महिला शिष्टमंडळ आज राज्यपाल यांची भेट घेणार आहेत. त्यामुळं सर्वांचे लक्ष रुपाली चाकणकर यांच्या पदाकडे वेधलं आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मागील काही दिवसात महिलांच्या प्रश्नांसंदर्भात, महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. तसेच, मनसेकडून महिला आयोगाचा संपर्क नंबर बंद असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

या आरोपानंतर आज गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. विधान भवनात ही बैठक आयोजितकरण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रमाणीकरण प्रक्रिया, अंतर्गत अडचणी, अंमलबजावणीची स्थिती, तसंच आयोगाकडून असलेल्या अपेक्षांचा आढावा घेतला जाणार आहे.

तर मविआच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे. या शिष्टमंडळामध्ये सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, रोहिणी खडसे, खासदार वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. महिला असुरक्षा, हिंसाचार आणि महिला आयोगाचा ढिसाळ कारभार यासर्वावर या भेटीदरम्यान चर्चा होणार आहे. महिला आयोगावर अराजकीय व्यक्तीची नियुक्ती व्हावी, महिला आयोगावर नव्या अध्यक्षाची निवड करावी अशी मागणीदेखीर राज्यपालांकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.