रुपाली चाकणकर यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर कारवाई

0
245

पुणे, दि. ६ (पीसीबी) – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर अश्लील मजकूर लिहिल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांचे मोबाइल संच जप्त केले आहेत.

जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी, सांगली), वसंत रमेशराव खुळे (रा. रहाटी, जि. परभणी), प्रदीप कणसे (रा. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. पाटील, खुळे आणि कणसे यांचे मोबाइल संच जप्त करण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर विकास सावंत, जयंत पाटील, रणजीतराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील अश्लील मजकूर लिहून टीका केली होती. तांत्रिक तपासात रणजीतराजे हत्तीमबिरे, अमोल पाटील नावाने खाते चालविणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जयंत पाटील याला नोटीस बजावून जबाब नोंदविण्यात आला असून त्याच्या मोबाइल संच जप्त करण्यात आला, तसेच वसंत खुळे, प्रदीप कणसे यांना नोटीस बजाविण्यात आली असून, त्यांचे मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल अडसूळ, विद्या साबळे, संतोष जाधव, दिनेश मरकड, सुनील सोनुने, उमा पालवे आदींनी ही कारवाई केली.
समाजमाध्यमात महिलांविषयी बदनामीकारक, तसेच अश्लील मजकूर लिहिणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. महिलांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा रामनाथ पोकळे यांनी केले आहे.