रीलवरील भाईंची पोलिसांनी जिरवलीसोशल मिडियावर पिस्टलचे रील्स ठेवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

0
87

चिखली, दि. 18 (प्रतिनिधी) –
१८ जुलै (पीसीबी)  – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोशल मिडियाद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या रील भाईंवर लक्ष केंद्रित केले आहे. चिखली परिसरात दुचाकीवरून जाताना पिस्टल हवेत फिरवून दहशत पसरविणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

कुणाल रमेश साठे (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह यश कांबळे (रा. टॉवर लाईन, चिखली), सुशील गोरे उर्फ बारक्या (रा. ओटास्कीम, निगडी) आणि रोहित मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार आशिष बोटके यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, तोडफोड करतानाचे व्हिडीओ बनवून, शस्त्र हातात घेऊन दहशत पसरवताना व्हिडीओ काढून ते सोशल मिडियावर अपलोड करणे, असे प्रकार सध्या समोर येत आहेत. सोशल मिडियावरून आपली दहशत निर्माण करणाऱ्या भुरट्या आणि स्वयंघोषित भाई लोकांना वठणीवर आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोशल मिडियावर लक्ष केंद्रित केले आहे.

खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार आशिष बोटके यांना एका इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ दिसला. त्यामध्ये एका दुचाकीवर तिघेजण जात होते. त्यातील एकाच्या हातात पिस्टल होते. पिस्टल हवेत फिरवून ते दहशत निर्माण करत होते. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून त्यांनी दहशत पसरवली होती.

पोलिसांनी सुरुवातीला गाडीचा नंबर मिळवला. त्याआधारे पोलिसांनी गाडीवरील आरोपींची ओळख पटवली. मोरेवस्ती चिखली येथून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करत त्याचा एक साथीदार दुचाकी चालक कुणाल साठे याला पोलिसांनी अटक केली.

यश कांबळे हा दुचाकीवर पाठीमागे बसून पिस्टल हातात घेऊन दहशत पसरवत असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यांच्या पाठीमागे असलेल्या एका दुचाकीवरील त्यांच्या दोन साथीदारांनी हा व्हिडीओ बनवला असल्याचे दोघांनी सांगितले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम 7, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (अ), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस ठाण्यातही बनवले रील्स

रोहित मिश्रा याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 90 व्हिडीओ पोस्ट केलेले आहेत. सन 2019 पासून तो इन्स्टाग्राम अकाउंट वापरत आहे. त्यामध्ये अनेक व्हिडीओला चित्रपटातील गुन्हेगारीशी निगडीत संवाद वापरून बनवण्यात आले आहे. तर एक व्हिडीओ त्यांनी नवी मुंबई मधील वाशी पोलीस ठाण्याच्या एका खोलीतून बनवला आहे. त्याबाबत त्यांनी तसेच कॅप्शन देखील दिले आहे. त्यामुळे या आरोपींना खाकीचा धाक दाखवण्याची गरज आहे.