भोसरी, दि. ६ (पीसीबी) – भोसरी एमआयडीसीमध्ये गेल्या २ वर्षांपासून एका औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटचा वापर करुन केली जाणारी वीजचोरी महावितरणने नुकतीच उघडकीस आणली असून, या ग्राहकाकडून महावितरणने १९ लाख १९ हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच वीजचोरीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा लोकेश चंद्र यांनी वीज वितरण हानी कमी करण्याबाबत क्षेत्रिय अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी वीजचोरी विरोधात मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी खास पथक तयार केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली सहा. अभियंता गजानन झापे, वीज कर्मचारी हर्षद लोखंडे, सोमनाथ गायकवाड, महेश वाघमारे यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये तपासणी सुरु केली. तेंव्हा मे. गणेश प्रेसिंग या औद्योगिक ग्राहकाकडून रिमोटद्वारे वीजचोरी केली जात असल्याचे आढळले. वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य महावितरणने जप्त केले आहे. तसेच या ग्राहकाला मागील दोन वर्षांमध्ये केलेल्या ७७२७० युनीटच्या वीजचोरी पोटी १९ लाख १९ हजार ३६२ रुपयांचा दंड व २ लाख ३० हजारांचे तडजोड आकाराचे देयक देत दंड वसूल करण्यात आला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.