रिक्षा, टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संघटनांची एकजुट आवश्यक : बाबा कांबळे

0
95
  • – चंद्रपूर येथे महाराष्ट्र विदर्भस्तरीय आटो टॅक्सी चालकांचा मेळावा उत्साहात संपन्न

पिंपरी – रिक्षा टॅक्सी चालकांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. राज्यातील सर्व संघटनांनी मिळून एकजूट दाखवली तर शासनावर आणि प्रशासनावर दबाव पडेल. त्यामुळे रखडलेले प्रश्न त्वरित मार्गी लागेल. मतभेद बाजूला ठेवून राज्यभरातील सर्व रिक्षा चालकांनी आणि संघटनांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे आवाहन ऑटो टॅक्सी, रिक्षा, बस, ट्रक टेम्पो ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

चंद्रपूर येथे बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटनेच्या वतीने विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबा कांबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हुमणे होते.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, विदर्भ फेडरेशनचे संस्थापक नितीन मोहोळ, (अमरावती) ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, (नांदेड) महासंघाचे कार्याध्यक्ष चरणदास वानखेडे (नागपूर) सहसचिव आनंद चौरे (नागपूर) इलाज लोणी खान (अकोला) अब्बास भाई शेख राजकुमार रायपुरे, किरण कुमार पुणेकर, (बल्लारशा) सतीश समुद्रे (गोंदिया) अरविंद निमगडे, विनोद सहारे (गडचिरोली) जिल्हाध्यक्ष बळीराम शिंदे (चंद्रपूर)
आधी यावेळी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, ऑटो टॅक्सी चालक-मालकांची संख्या महाराष्ट्र मध्ये वीस लाखाच्या वरती पोचली आहे. मुक्त रिक्षा परवाना धोरणामुळे लोकसंख्येपेक्षा अधिक रिक्षा रस्त्यावर आहेत. दहा पटीने रिक्षाची संख्या वाढली आहे. आता इलेक्ट्रॉनिक रिक्षाचे संकट निर्माण झाले आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये रिक्षा चालकांचे जगणे मुश्किल झाले असून त्यात सरकारने पासिंग न केल्यास प्रत्येक दिवशी 50 रुपये दंड करून आर्थिक लूट सुरू केली असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

या मेळाव्यात बाबा कांबळे यांनी रिक्षा संघटना कृती समिती याविषयीचा इतिहास मांडला. ते म्हणाले की, महाराष्ट्र मध्ये सर्व संघटना एकत्र करून स्वर्गीय शरद राव व डॉ. बाबा आढाव यांनी कृती समितीची स्थापना केली होती. कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात सर्व संघटना एकत्र यायच्या. परंतु नंतर कृती समितीमध्ये फूट पडली. बाबा आढावांची वेगळी आणि शरद राव यांची वेगळी अशा दोन कृती समिती स्थापन झाल्या. यानंतर पुढे चालून शरद राव प्रणित कृती समितीमध्ये फूट पडली. त्यामध्ये शशांक राव यांची व बाबा कांबळे यांची अशा दोन कृती समिती स्थापन झाल्या. कृती समिती मधून काही लोक बाहेर पडून त्यांनी महासंघ स्थापन केला. नंतर महासंघामध्येही फूट पडली. या फाटा फुटींमुळे तसेच मतभेदामुळे रिक्षा चालकांचे प्रश्न मात्र तसेच राहत आहेत. त्यामुळे आगामी काळात एकच कृती समिती ठेवून त्या अंतर्गत सर्व रिक्षा संघटनांनी काम करणे गरजेचे असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

यावेळी, आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, नितीन मोहोळ, नरेंद्र गायकवाड, चरणदास वानखेडे आनंद भाऊ चौरे यांनी देखील रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले.