रिक्षा चालकावर प्राणघातक हल्ला करत वाहनांची तोडफोड आणि दहशत, एकास अटक

0
430

थेरगाव, दि. ६ (पीसीबी) – रिक्षा चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत रिक्षाची तसेच अन्य वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास धनगर बाबा मंदिराजवळ थेरगाव येथे घडली.

स्वप्निल संजय सगर (वय 22, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन नारायण भागडे (वय 33, रा. थेरगाव. मूळ रा. बुलढाणा) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी नितीन हे त्यांचा मित्र आणि त्याच्या कुटुंबीयांसह रिक्षातून जात होते. धनगर बाबा मंदिराजवळ आल्यानंतर आरोपी स्वप्निल याने कोयत्याने फिर्यादी यांच्यावर हल्ला केला. फिर्यादी यांनी कोयत्याचा वार हुकवला. त्यानंतर आरोपीने रिक्षाची तोडफोड केली. कोयता हवेत फिरवून मोठमोठ्याने ओरडून परिसरात दहशत पसरवली. ‘माझे नाव स्वप्निल सगर आहे. मी थेरगावात राहतो. एकेकाला जिवे मारून टाकतो,’ अशी त्याने धमकी दिली. आरोपीने सादिक पठाण यांच्या कारची तसेच अन्य वाहनांची तोडफोड करून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.