रिक्षा चालकाला मारहाण करणा-या दोघांवर गुन्हा

0
77

महाळुंगे, दि. ०१ (पीसीबी) : रिक्षा वळवित असताना रिक्षाचा धक्का एका महिलेला लागला. या कारणावरून चिडलेल्या दोन जणांनी रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 30) दुपारी चाकण जवळील खराबवाडी परिसरात घडली.

जीवन लक्ष्मण पाटील (वय 23, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळा जोगदाने (वय 25) आणि त्याचा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वाघजाईनगर फाटा, खराबवाडी येथे फिर्यादी रिक्षा वळवत असताना रिक्षाच्या टायरचा धक्का आरोपी जोगदाने याच्या आईला लागला. या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी जीवन यांना प्लॅस्टीकच्या पाइपने व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.