रिक्षा चालकाला मारहाण करून लुटले; दोघांना अटक

0
683

चिंचवड , दि. २९ (पीसीबी) – रिक्षा चालकाला विनाकारण बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील पैसे काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 27) रात्री दहा वाजता जयश्री टॉकीज बसस्टॉप जवळ चिंचवड येथे घडली.

श्रीकांत उर्फ ज्ञानेश्वर माऊली गालफाडे (वय 21), स्वप्नील बंडू उघडे (वय 20, रा. चिकन चौक, ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आकाश भाऊसाहेब आम्ले (वय 30, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. ते रविवारी रात्री दहा वाजता जयश्री टॉकीज बसस्टॉप जवळ थांबले असता आरोपी तिथे आले. त्यांनी विनाकारण फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने, कमरेच्या पट्ट्याने व दगडाने फिर्यादी यांच्या तोंडावर, डोक्यात, पाठीवर बेदम मारहाण केली. त्यात फिर्यादी हे जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी ‘पोलीस स्टेशनला गेला तर तुला बघून घेईल’ अशी फिर्यादी यांना धमकी दिली. फिर्यादी यांच्या खिशातून एक हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.