रिक्षा चालकाकडून 50 रुपयांसाठी प्रवासी महिलेला शिवीगाळ

0
557

वाकड, दि. १७ जुलै (पीसीबी) – रिक्षा चालकाकडे राहिलेले 50 रुपये देण्यास रिक्षा चालकाने नकार दिला. त्यावरून त्याने प्रवासी महिलेला शिवीगाळ करून रस्त्यात अडवून दमदाटी केली. ही घटना रविवारी (दि. 16) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वाकड येथे घडली. पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे.

भास्कर अंबादास गायकवाड (वय 60, रा. मोशी) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय प्रवासी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड बस थांबा ते वाकड येथे येण्यासाठी फिर्यादी यांनी आरोपी रिक्षा चालकासोबत 150 रुपये भाडे ठरवले. त्यानुसार वाकड येथे आल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीला 100 रुपयांच्या दोन नोटा दिल्या. त्यातील 50 रुपये फिर्यादीस परत द्यावे लागत असताना आरोपीने ते देण्यास नकार दिला. त्याने फिर्यादीस दमदाटी करत शिवीगाळ केली. फिर्यादीच्या अंगावर धावून येत हात उगारला. फिर्यादी घाबरून घरी निघून जात असताना आरोपीने फिर्यादीस रस्त्यात अडवले आणि पुन्हा दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत