रिक्षाचालक ते आता बंडखोर शिवसैनिक; एकनाथ शिंदेंची आतापर्यंतची संपत्ती किती ?

0
287

मुंबई,दि.२६(पीसीबी) – सध्या एकनाथ शिंदे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय भूकंपात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे आणि आता त्यांच्या गटात अपक्ष आणि शिवसेना असे मिळून 50 आमदार असल्याचा दावा स्वतः शिंदे यांनीच केला आहे. मात्र सध्या चांगलेच चर्चेत असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे किती संपत्ती आहे, याबाबत तुम्हाला माहिती आहे का?

2019 साली दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी घर, गाडी, मालमत्ता, सोनं, गुंतवणूक, कर्जासह इतर माहिती जाहीर केली होती. 2019 साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. यामध्ये एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं दिलं गेलं. आता 2019 पर्यंत नेमकी त्यांची संपत्ती किती होती, याची आकडेवारी समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा अतिशय संघर्षाचा होता. रिक्षाचालक ते आता बंडखोर शिवसैनिक असा हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, आता परिस्थितीत बदलली आहे. एकनाथ शिंदे यांची संपत्ती जाणून तुम्हाला याची कल्पना येईलच.

2019मध्ये एकनाथ शिदे यांच्याकडे एकूण सात गाड्या होत्या. या सर्व गाड्यांची एकत्रित किंमत 46 लाख रुपये इतकी होती. यात स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा, अरमाडा, टेम्पो या गाड्यांचा समावेश होता. प्रत्येकी दोन स्कॉर्पिओ आणि इनोव्हा तर प्रत्येकी एक बोलेरो, आरमाडा आणि टेम्पो एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. याशिवाय एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हरही आपल्याकडे असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 28 लाख रुपयांची शेतजमीन आहे. हे जमीनमूल्य 2019 च्या बाजारभावाप्रमाणे लावण्यात आलेलं आहे. यात आता काही प्रमाणात वाढ झालेली असू शकते. महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदे यांची 12 एकर जमीन आहे. याशिवाय चिखलगाव, ठाण्यात पत्नीच्या नावे 1.26 हेक्टर जमीन असल्याचीही माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिलेली.

एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, स्पेशल टीम पडणार गुवाहाटीबाहेर, पुन्हा गुजरात मुख्य केंद्र
वागळे इस्टेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावावर 30 लाखांचा एक दुकानाचा गाळा आहे. तर ठाणे पश्चिमेच्या वागळे इस्टेटमधील धोत्रे चाळीत एक घर आहे. हे घर 360 स्केअर फिट आहे. तर लँडमार्क को ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान फ्लॅटही आहे. या फ्लॅटचं क्षेत्रफळ 2370 स्केअर फिट आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावेही असाच एक फ्लॅट याच सोसायटीमध्ये आहे. तर शिवशक्ती भवन इथेही एक फ्लॅट पत्नीच्या नावे घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. घरं आणि गाळ्याांचा आताचं मूल्य 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. 2019 साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्यावर 3 कोटी 74 लाख रुपयांचं कर्ज होतं. आता गेल्या अडीच वर्षातील एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत नेमकी किती वाढ झाली, हे कळू शकलेलं नाही.