रिंकूचा ” आठवा रंग प्रेमाचा ” चित्रपट पाहून पिंपळे सौदागरमधील नागरिक भावुक..

0
260

उन्नती सोशल फाउंडेशनने चित्रपटामागील खरा आशय प्रेक्षकांसमोर आणला – रिंकू राजगुरू

… संघर्षाची खरीखुरी कहाणी असणारा सामाजिक चित्रपट – कुंदाताई भिसे

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) :- चेहरा खराब करून कुणाचं अस्तित्व संपवता येत नाही आणि तो खराब केल्यांनतर आपल्या अस्तित्वाची लढाई अर्ध्यात सोडून चालत नाही. उलट ती जास्त नेटाने लढावी लागते आणि ती प्रत्येकीने लढावी. कारण आपली ओळख फक्त आपला चेहरा नसतो, अशा प्रतिक्रिया पिंपळे सौदागरवासियांनी रिंकूच्या” आठवा रंग प्रेमाचा ” हा चित्रपट पाहून दिल्या.

उन्नती सोशल फाउंडेशन आणि सौ. कुंदाताई भिसे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील नागरिकांना मराठी सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू हीचा वेगळा लूक आणि वेगळा धाटणीचा ” आठवा रंग प्रेमाचा ” हा चित्रपट पाहण्याचा योग जुळून आला. रहाटणीतील स्पॉट १८ सिटी प्राईड रॉयल थिएटरमध्ये सौदागर मधील नागरिकांसाठी खास मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास दोनशे ते अडीचशे नागरिकांनी हा चित्रपट पहिला. चित्रपट पाहून महिला भावुक झाल्या होत्या. यावेळी अनेकांनी रिंकूशी दिलखुलास गप्पा मारल्या.

” आठवा रंग प्रेमाचा ” या चित्रपटातील भूमिकेविषयी रिंकू म्हणाली, आपलं प्रत्येक काम आधी केलेल्या कामापेक्षा वेगळं असावं असं नेहमीच वाटतं. या चित्रपटाची संहिता वाचल्यावर मला वाटलं की, आपण ही भूमिका करायला हवी. या भूमिकेसाठी प्रोस्थेटिक मेकअप करावा लागला. या भूमिकेमुळे अ‍ॅसिड अ‍ॅटैक सव्हायव्हर या त्यांचं आयुष्य कसं जगत असतील हे कळलं. पुण्यातील पिंपळे सौदागरमधील उन्नती सोशल फाउंडेशन आणि सौ. कुंदाताई भिसे यांनी आज हा शो स्पॉन्सर करून या चित्रपटामागील खरा आशय प्रेक्षकांसमोर आणला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या येणाऱ्या वर्धापनदिनास माझ्या हार्दिक शुभेच्छा.

कुंदाताई भिसे म्हणाल्या, या सिनेमात रिंकूने एका अ‍ॅसिड व्हिक्टिमची म्हणजे अ‍ॅसिड हल्ल्यात विद्रूप झालेल्या तरुणीची भूमिका साकारली आहे. माणसाच्या बाह्यरूपापेक्षा आंतरिक रूपावर प्रेम करायला हव हा विचार मांडणारा हा चित्रपट आहे. काळ कितीही आधुनिक झाला, तरी स्त्रियांवरील अत्याचार थांबेनात. अ‍ॅसिड हल्ले, स्त्रियांवरील अत्याचार, समाजाचा दृष्टीकोन बदलत नाहीत. संघर्षाची खरीखुरी कहाणी असणारे असे सामाजिक चित्रपट आले पाहिजेत. लोकांपर्यंत त्यांच्या वेदना पोहोचल्या पाहिजेत.

अभिनेता विशाल आनंद याने उत्कृष्ट भूमिका सादर केल्यामुळे प्रेक्षकांना एका अनोख्या स्टोरीचा अनुभव आला. दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी केले आहे. तर, दिग्दर्शिका खुशबू सिन्हा यांचाही दिग्दर्शनाचा रोल महत्त्वाचा ठरला आहे. दोघांनी एका अनोख्या कथेला मूर्त स्वरूप मिळवून दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुधा गोडसे यानी केले.