रा. स्व. संघानेच आणीबाणीला पाठिंबा दिला होता, शाहा यांचे वय काय होते ?

0
98

केंद्र सरकारने आणीबाणीचा निषेध म्हणून दरवर्षी 25 जून रोजी संविधान हत्या दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी तर मोदी सरकार आल्यापासून देशात रोजच कशी संविधानाची हत्या चालू आहे याची आकडेवारीच सादर केली आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही संविधान हत्या दिवस साजरा करण्याचा निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही केंद्र सरकारच्या निर्णयावर कठोर हल्ला चढवला आहे. भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानचे आणीबाणीला पाठिंबा दिला होता, असं सांगतानाच आणीबाणीबद्दल अमित शाह यांना काय माहीत आहे? तेव्हा त्यांचं वय तरी काय होतं? असा सवाल केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या 10 वर्षातील मोदींच्या काळातील प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस आहे. त्यामुळे ते कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात हे पाहावं लागले. आणीबाणीच्या संदर्भाने म्हणणार असेल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि बाळासाहेब ठाकरे होते. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून मते मागता? फोटो काढा बाळासाहेबांचे. बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

त्यावर काय म्हणणं आहे ते सांगा
हे अनुशासन पर्व आहे. देशाला शिस्त लावण्यसाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलली पाहिजे, अशा प्रकारची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन करताना परखड भूमिका होती. यावर अमित शाह आणि मोदींचं काय म्हणणं आहे ते सांगा? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

शाह यांचं वय काय होतं?
आणीबाणी हे देशाच्या संरक्षणाचं प्रकरण होतं. काही लोक देशात बॉम्ब बनवत होते आणि स्फोट घडवून आणत होते. हे सर्वांना माहीत आहे. अमित शाह यांना आणीबाणी काय आहे माहीत नाही. तेव्हा त्यांचं वय काय होतं माहीत नाही. आज ते ज्या नकली शिवसेनेसोबत बाळासाहेब ठाकरेंचं गुणगाण गात आहेत, त्या बाळासाहेबांनीच त्यावेळी आणीबाणीला जाहीर पाठिंबा दिला होता. आणीबाणीचं मुंबईत स्वागत केलं होतं. संघानेही समर्थन केलं, असं राऊत म्हणाले.

हे कोण टिक्कोजीराव
आणीबाणीनंतर जनता पार्टीचं सरकार आलं. जनता पार्टीला संविधानाची हत्या झाल्याचं वाटलं नाही. अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं, त्यांनाही संविधानाची हत्या झाली असं वाटलं नाही. चंद्रशेखर पंतप्रधान बनले, त्यांना वाटलं नाही संविधानाची हत्या झाली. मग हे कोण टिक्कोजीराव? त्यांच्याकडे बहुमत नाही. लोकांनी त्यांना नाकारलं. त्यांचं दिमाग ठिकाण्यावर नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.

संविधान बदलणार होते म्हणूनच नाकारलं
कायदा, सेंट्रल एजन्सी, भ्रष्टाचार आणि अराजकता देशात वाढली आहे. ही संविधानाची हत्याच आहे. मोदी आणि भाजपला बहुमत मिळालं नाही. याचं कारण ते संविधान बदलणार होते. संविधान बदलणार होते म्हणूनच त्यांना जनतेने नाकारलं, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.