रा.स्व.संघातर्फे रविवारी चिंचवडमध्ये ‘पांचजन्य ‘चे आयोजन; घोषाचे भव्य प्रांगणीय संगीत वादन

0
273

चिंचवड दि.१६ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंचवड गटाच्या घोष विभागातर्फे ‘ पांचजन्य ‘ या प्रांगणीय संगीत वादन भव्य कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल शाळेत करण्यात आले आहे.

मानवी जीवनात संगीताला अनन्यसाधारण महत्व असून मनामध्ये चेतना जागृतीसह भाषेविना संवाद साधण्याचे सामर्थ्य संगीतात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्येही याचे विशेष महत्व असून संघाच्या घोष (बँड) पथकाचे स्वयंसेवकांबरोबरच समाजामध्ये देखील विशेष आकर्षण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिंचवड गटाच्या घोषपथकातील स्वयंसेवक भारतीय रागदारीवर आधारित विविध संगीत रचनांचे वादन या कार्यक्रमात करणार आहेत.

वादनासोबतच विविध आकृतीबंधाच्या रचनांचे सादरीकरण देखील होणार आहे. या कार्यक्रमाला प्रख्यात वेणू वादक डॉ. पं.केशव गिंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून प्रमुख वक्ते क्रीडा भारतीचे राष्ट्रीय महामंत्री राज चौधरी मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त घोष, संगीत प्रेमींनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन चिंचवड गटाचे संघचालक प्रतापराव जाधव यांनी केले आहे.