नागपूर, दि. ४ (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक काही वर्षांपासून संघाच्या संपर्कात नसलेल्या कुटुंबांशी संपर्क प्रस्थापित करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून ४, ५ जानेवारीला मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे कुटुंब प्रबोधनासाठी अखिल भारतीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत ४६ प्रांतांतील कुटुंब प्रबोधन उपक्रमाचे प्रांतीय समन्वयक व सहसंयोजक पत्नीसह ओंकारेश्वर येथे एकत्र येणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या बैठकीला मार्गदर्शन करतील. कुटुंब प्रबोधन उपक्रमाचे अखिल भारतीय समन्वयक डॉ. रवींद्र शंकर जोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कुटुंब प्रबोधन उपक्रम २००८ मध्ये सुरू झाला. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत झालेल्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता (निमंत्रण) वाटपासाठी देशातील बहुतांश घरांशी संघाचा पुन्हा संपर्क आला. यामध्ये अनेक नवी कुटुंबे संघाशी जोडली गेली.
अकरा गटप्रमुखांची नियुक्ती
या बैठकीत ‘कुटुंबप्रणाली सक्षम करा’ या विषयावर संवाद व कुतूहल संकल्पना आयोजित करण्यात आली आहे. भौगोलिक रचनेनुसार अकरा गटप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. कौटुंबिक मित्रांच्या माध्यमातून ४६ प्रांत आणि ९०० जिल्ह्यांमध्ये संघ कार्याचा विस्तार करण्याची योजना आहे. कुटुंबात राष्ट्रीय दृष्टी आणि सामाजिक मूल्ये जागृत करून परस्पर प्रेम, आदर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, अशी माहिती आयोजकांनी दिली.
कौटुंबिक प्रबोधन हा उपक्रम २००८ पासून सुरू झाला असला तरी संघात पाच वर्षांपूर्वी या विषयावर कामास खरी सुरुवात झाली. अयोध्येतील राम मंदिरासाठी जानेवारी २०२१ मध्ये सुरू झालेल्या निधी संकलन अभियानाच्या माध्यमातून संघ स्वयंसेवकांनी परिचयाबाहेरील कुटुंबांशी संपर्क प्रस्थापित केला. – रवींद्र जोशी, समन्वयक, कुटुंब प्रबोधन उपक्रम