विकासकामांच्या पुण्याईवरच नाना काटेंचा विजय निश्चित
चिंचवड, दि.१८ (पीसीबी) – भाजपच्या भ्रष्ट कारभाराला इथली जनता वैतागली आहे. पिंपरी-चिंचवडचा विकास फक्त अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. भाजपच कोणताही नेता निवडणुकीमध्ये सहभागी होत नसल्याने त्यांनी हार स्वीकारल्याची मानसिकता दिसून येते. कोणताही गाजावाजा न करता आपले काम शांतपणे विकासकाम करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे त्यांनी केलेल्या विकासकामांच्या पुण्याईवरच निश्चित निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते तथा कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेत आमदार रोहित पवार सहभागी झाले होते.
यावेळी त्यांच्यासमवेत पदयात्रेत नाना काटेंसह प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेविका शमीम पठाण, वैशालीताई काळभोर, सुलक्षणा शिलवंत, माऊली सूर्यवंशी, लाला चिंचवडे, विनोद कांबळे, ज्योतीताई गोफणे, संगीताताई कोकणे, सचिन नखाते, अभिजित भालेराव, धनंजय भालेकर, धनंजय वाल्हेकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही पदयात्रा प्रभाग क्रमांक 26 मधील बिजली नगर, चिंचवडे नगर, आशाताई माऊली सूर्यवंशी संपर्क कार्यालय, गणपती मंदिर, शिवनगरी चौक, तुळजाभवानी मंदिर, साई मंदिर, बळवंत नगर, हनुमान मंदिर, साईराज कॉलनी, स्पाईन रोड,चौक, दगडोबा चौक आदी मार्गांवरून निघाली.
आ. रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे अहंकाराची भाषा बोलत आहेत. नागरिक अहंकार स्वीकारत नाहीत. त्यांना वीस हजार मते पडतील. जगताप कुटुंबाबद्दल नागरिकांमध्ये सहानुभूती आहे. मात्र अजित पवार यांनी केलेला विकास हे नागरिक विसरले नाहीत. भाजपाला आम्ही मत देणार नाही उलट राष्ट्रवादीला निवडून आणणार असल्याचे वातावरण नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शांततेत लोकांची कामे करणारे नाना काटे हे प्रचंड मतांनी निश्चित विजयी होणार आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्षांना झटका बसणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे काहीही बोलले ते खरं होणार आहे का? इथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार आहे, त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनाच झटका बसणार. याआधीही वंचितमुळे अनेक ठिकाणी नुकसान घडून आले आहे. वंचितच्या कार्यकर्त्यांनी याकडेही पाहिले पाहिजे. भाजप हा राज्यघटनेच्या विरोधात वागत आहे. वंचितचे कार्यकर्तेही राज्यघटनेविरोधात काम करणार्या पक्षाला धडा शिकविण्यासाठी नाना काटे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
आ. रोहित पवार.. वडापाव.. आणि गप्पा !
आ. रोहित पवार हे जसे परखड, अभ्यासू आणि फर्डे वक्ते म्हणून ओळखले जातात, तसेच एक अतिशय साधा माणूस म्हणूनही लोक त्यांना ओळखतात. याचा प्रत्यय शुक्रवारी चिंचवडमध्ये आला. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारफेरीत सहभागी झालेले आ. रोहित पवार यांनी भूक लागल्यामुळे सर्वांना थांबवून चक्क साई टी स्टॉल या दुकानातील वडापावचा मनसोक्त आस्वाद घेतला ! वडापाव खाता खाताच ते उपस्थित महिलांशी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही बोलत होते. कोणताही बडेजावपणा न दाखवणार्या आ. रोहित पवार यांच्या या साधेपणाची प्रचारादरम्यान चर्चा रंगली.