राहुुल गांधींची खासदारकी जाते अन् नवनीत राणांना मुदतवाढ मिळते, हे कशाचे द्योतक

0
256

कराड, दि. ७ (पीसीबी) : नवनीत राणा आणि सोलापूरच्या खासदारांना आपले पद टिकविण्यास मुदत मिळते; पण राहुल गांधींची खासदारकी जाते, हे कशाचे द्योतक आहे. सध्‍या राज्यात नेतेमंडळी चोरणारी टोळी फिरत आहे. त्यांचे काम घरे फोडायचे सुरू आहे. देश व राज्यात चाललेल्या वेगळ्या परिस्थितीचा येत्या निवडणुकांमध्ये वचपा काढा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.

कापील येथे खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभात ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, जयेश मोहिते, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रा. धनाजी काटकर, कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ मोरे, गोळेश्‍वर विकास सेवा सोसायटीचे संचालक संतोष जाधव, नानासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

उदयसिंह पाटील म्हणाले, विलासकाकांनी प्रस्थापित सरंजामदार लोकांच्या विरोधात राहून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. मनोहर शिंदे म्हणाले, हे गाव विकासकामांसाठी आग्रही राहते. खासदार श्रीनिवास पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण हे लोकप्रतिनिधी असणे, हे खूप दुर्मीळ व भाग्याची गोष्ट आहे.

प्रा. काटकर यांचे भाषण झाले. वसंतराव जाधव, भरत पाटील, सुरेश जाधव, प्रल्हाद देशमुख, भाऊसाहेब ढेबे, राहुल पाटील, सागर पाटील, संभाजी पाटील, एच. के. पाटील, तानाजीराव गायकवाड, संभाजी मदने, धोंडिराम मोरे, जयवंत पाटील, धनंजय जाधव यांनी संयोजन केले. कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे यांनी प्रास्ताविक केले. सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले व राहुल पाटील यांनी आभार मानले.