राहुल गांधी यांची ‘भारत न्याय यात्रा’ 14 जानेवारीपासून, मणिपूर ते मुंबई प्रवास

0
143

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) : काँग्रेसची ‘भारत न्याय यात्रा’ 14 जानेवारीपासून सुरु होणार आहे. राहुल गांधी यावेळी मणिपूर ते मुंबई यात्रा करणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी बुधवारी ही माहिती दिली. राहुल गांधी यांचा यात्रामार्ग 6200 किलोमीटरचा असणार आहे. 14 जानेवारी ते 20 मार्चपर्यंत ‘भारत न्याय यात्रा’ चालेल. काँग्रेसची ही न्याय यात्रा एकूण 14 राज्यातून जाईल.

काँग्रेसची ही ‘भारत न्याय यात्रा’ 14 राज्य आणि 85 जिल्ह्यांमधून जाणार आहे. मणिपुर, नागालैंड, असम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ़, यूपी, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र मुंबईत येणार आहे. यात्रामार्ग मोठा आहे. काही ठिकाणी बसने तर काही ठिकाणी पायी प्रवास होईल. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ‘भारत न्याय यात्रेला’ हिरवा झेंडा दाखवतील.

मणिपूरमधून यात्रेची सुरुवात का?
“मणिपूर देशाचा महत्त्वाचा भाग आहे. आम्ही तिथल्या लोकांच्या जखमेला मलम लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही काही राजकीय यात्रा नाही. जे पीडित आहेत, त्या सर्वसामान्य लोकांसाठी ही यात्रा आहे म्हणून मणिपूरमधून यात्रेची सुरुवात होईल” असं काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सांगितलं.

यात्रेचा हेतू-उद्देश काय?
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं की, ‘भारत जोड़ो यात्रा’ भारताला जोडण्यासाठी होती. आता ‘भारत न्याय यात्रा’ असेल. भारत जोड़ो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मुद्दे उपस्थित केले होते. आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही. आता भारत न्याय यात्रेचा मुद्दा आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि राजकीय न्याय आहे”

शरद पवार सहभागी होणार का?
राहुल गांधी यांच्या ‘भारत न्याय यात्रेचा’ समारोप मुंबईत होण्याची शक्यता आहे. याआधी त्यांच्या ‘भारत जोड़ो यात्रेत’ आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. आता राहुल यांची यात्रा मुंबईत येईल, तेव्हा त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होतील का? सध्या इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरत नाहीय.