नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. तीन दिवसांपासून राहुल गांधी यांना चौकीसाठी बोलावले जात आहे. आजदेखील त्यांना पुन्हा ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. याच कारणामुळे राजधानी दिल्लीसह देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते तथा कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने केले जात आहेत. या निदर्शनांचं लोण पुण्यापर्यंत पोहोचलं आहे.
पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार तसेच भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच येथे टायर पेटवून ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला.
या आंदोलनादरम्यान, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी ईडी, भाजपा आणि मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता.